नांदेड(प्रतिनिधी)-वास्तव न्युज लाईव्हच्या संपादकांना 15 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता पिस्तुल दाखवून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल दिलेली तक्रार फक्त संपादकाला त्याची पोच देवून ती तक्रार ठेवून घेण्यात आली. याबद्दल वजिराबादचे पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांनी सांगितले की, मला गुन्हा दाखल करण्यासाठी विचारणा करावी लागते. हा एक नवीन प्रकार नांदेड जिल्ह्याच्या वजिराबाद पोलीस ठाण्यात सुरु झाला आहे.
15 ऑगस्ट रोजी वास्तव न्युज लाईव्हचे संपादक हे आपल्या एका ओळखीच्या माणसासह दुचाकीवरून रेल्वे स्थानक ते वजिराबादकडे येत असतांना परमेश्र्वर गोणारेने त्यांना आवाज देवून आपल्याजवळ बोलावले आणि माझ्याविरुध्द बातम्या लिहितोस काय अशी विचारणा केली. त्यावेळी त्याच्यासोबत आणखी एक माणुस होता. यानंतर परमेश्र्वर गोणारेने संपादक कंथक सुर्यतळ यांना बंदुक दाखवून तुला जिवे मारून टाकील असे बोलत त्यांच्यावर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. तेंव्हा कंथक सूर्यतळ तेथून पळून आले आणि याबाबतची तक्रार घेवून दुपारी 3 वाजता पोलीस ठाणे वजिराबाद येथे गेले. त्यावेळी त्यांच्यासोबत रामप्रसाद खंडेलवाल आणि सोबत असणारा व्यक्ती होता.
जगदीश भंडरवार हे वजिराबाद पोलीस ठाण्यात सायंकाळी 5 वाजता आले. तक्रार वाचून मला घटनास्थळ पाहायचे असे म्हणून कंथक सुर्यतळ यांना सोबत घेवून गेले. तेथे त्यांनी बऱ्याच बारकाईने विचारणा केली. पण गुन्हा दाखल केला नाही. याबद्दल विचारणा केली असता मला गुन्हा दाखल करण्यासाठी अधिकाऱ्यांना विचारणा करावी लागते असे उत्तर दिले. तसेच गुन्हा दाखल करण्याअगोदर घटनास्थळ पाहण्याची प्रक्रिया सुध्दा नवीनच सुरू करण्यात आली. पोलीस नियमावली आणि फौजदारी प्रक्रिया संहितेमध्ये अशी विचारणा करावी लागते, घटनास्थळ पहिले पाहावे लागते असे कोठेच लिहिलेले नाही. सायंकाळी 7 वाजता कंथक सुर्यतळ यांनी याबाबतची तक्रार पोलीस महासंचालक यांच्या ईमेल आयडीवर पाठवली आहे.
