नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड शहर उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक श्री.चंद्रसेनजी देशमुख साहेब यांनी रात्री वाळू भरलेल्या तीन गाड्या तीन पोलीस ठाण्याच्या प्रांगणात उभ्या केल्या आहेत. आता सायंकाळचे 4 वाजत आले आहेत. पण अद्याप या गाड्यांवर कोणतीच कार्यवाही झालेली नाही.
नांदेड शहर उपविभागाचे अत्यंत कर्तव्यदक्ष पोलीस उपअधिक्षक श्री.चंद्रसेनजी देशमुख साहेब यांनी काल रात्री एक हायवा गाडी वजिराबाद पोलीस ठाण्याच्या प्रांगणात आणूण उभी केली. त्या गाडीचा क्रमांक एम.एच.26 बी.ई.4992 असा आहे. ही गाडी वाळूने भरलेली आहे. परिवहन विभागाच्या ऍपवर या गाडीची तपासणी केली असता या गाडीच्या मालकाचे नाव नवनाथ पुंड असे आहे. पोलीस ठाणे भाग्यनगरच्या हद्दीत एम.एच.26 बी.ई.9004 क्रमांकाचा टिपर देशमुख साहेबांनी उभा केला आहे. त्या गाडीचा शोध परिवहन विभागाच्या ऍपमध्ये घेतला असतांना त्या गाडीच्या मालकाचे नाव नंदन देशमुख असे दाखवत आहे. तसेच या गाडीचा विमा 24 जानेवारी 2022 रोजी समाप्त झालेला आहे. तिसरी एक वाळूची गाडी क्रमांक एम.एच.22 ए.ए.3891 विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत उभी करण्यात आली आहे. या गाडीची मुळ नोंदणी 2017 मध्ये झालेली आहे. मालकाचे नाव परिवहन विभागाच्या ऍपवर शिवाजी जावळे असे दाखवत आहे. या गाडीची नोंदणी 29 मार्च 2019 पर्यंत अधिकृत होती. या गाडीचा विमा 30 मार्च 2022 रोजी संपलेला आहे.
या वाळूच्या गाड्या रात्री पकडलेल्या आहेत. गौण खनिज कायदा आणि महसुल कायदा यानुसार वाळूवरील नियंत्रण केले जात असते. आता सायंकाळचे 4 वाजले आहेत. पण या गाड्यांवर अद्याप कोणतीच कार्यवाही झाल्याची नोंद वजिराबाद, विमानतळ आणि भाग्यनगर पोलीस ठाण्यांमध्ये दिसत नाही. गौण खनिज कायद्यामध्ये सुर्यास्त ते सुर्योदय या कालखंडात कोणत्याही प्रकारे वाळूची वाहतुक करता येत नाही. वाळूचा उपसा करता येत नाही. पण हा कारभार रात्रीच जास्त चालतो हे या तिन गाड्या पोलीस ठाण्यांच्या प्रांगणात आणून उभ्या केल्यामुळे स्पष्टच झाले आहे. पण आता वृत्तलिहिपर्यंत सुध्दा या गाड्यावर कोणतीही कायदेशीर कार्यवाही का झाली नाही याचे गमक मात्र शोधण्याइतपत ताकत आमच्यात नव्हती.
