नांदेड(प्रतिनिधी)-वीज बिलाचे संदेश मोबाईलवर पाठवून त्यातून ऑनलाईन फसवणूकीचे प्रकार वाढतच आहेत. जनतेने सुध्दा ओळखीच्या नसलेल्या नंबरवरून आलेल्या संदेशांना, बोलण्याला प्रतिसाद देवू नये असे पोलीस विभाग सांगते, वास्तव न्युज लाईव्ह सुध्दा दरवेळेस याबद्दल आवाहन करते. तरीपण फसवणूका होतच आहेत. असाच एक प्रकार भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत घडला आणि त्याच्या बॅंक खात्यातून 97 हजार 272 रुपये वळविण्यात आले आहेत.
जयंत सुधाकरराव जोशी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या मोबाईल क्रमंाकावर वीज बिल भरले असून ते ऍपडेट न झाल्याचा संदेश आला. हा संदेश मोबाईल क्रमांक 8927370658 वरुन आला होता. जयंत जोशी यांनी त्यावरील मार्गदर्शनाप्रमाणे ही बोगस लिंग आणि ऍप डाऊनलोड केला त्यावेळी 12 रुपये भरा असा संदेश आला. आपल्या क्रेडीट कार्ड क्रमांकावरून जयंत जोशी यांनी 12 रुपये भरले आणि सोबतच त्यांच्या मोबाईलमधून एकूण 97 हजार 272 रुपये वळती झाले. हा प्रकार 8 ऑगस्ट रोजी दुपारी 12.03 ते 12.20 अशा फक्त 13 मिनिटात घडला. भाग्यनगर पोलीसांनी हा गुन्हा भारतीय दंड संहितेच्या कलम 420 आणि तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66(डी) प्रमाणे क्रमांक 280/2022 असा दाखल केला आहे. पोलीस निरिक्षक सुधाकर आडे अधिक तपास करीत आहेत.
भाग्यनगरचे पोलीस निरिक्षक सुधाकर आडे यांनी जनतेला आवाहन केले आहे की, अशा कोणत्याही अनोळखी फोन क्रमांकावरून आलेले संदेश पाळू नका त्यांनी सांगितलेली लिंक डाऊनलोड करून त्यातील ऍप डाऊनलोड करू नका, जेणे करून तुमच्या बॅंक खात्यातील रक्कम गायब होणार नाही.
