शहरातील ड्रेनेज चेंबर्सवर झाकने नसल्याचा मुद्दा आजही कायमच
नांदेड(प्रतिनिधी)-कोविड कालखंडात प्रतिबंधीत क्षेत्रासाठी वापरण्यात आलेल्या लाकडांचे बील महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेने आज मंजुर केले आहे. त्यातील 94 लाख 68 हजार 43 रुपये पोलीस विभागाने अगोदरच श्री सहयोग सेवा अर्थात दडू पुरोहित यांना दिले आहेत असा महानगरपालिका 1 कोटी 49 लाख 32 हजार 574 रुपये दडू पुरोहित यांना देणार आहे याबाबत सर्वसाधारण सभेने शिक्का मोर्तब केला.
कोविड कालखंडामध्ये ज्या ठिकाणी कोविड रुग्ण सापडला त्या संपुर्ण भागाला प्रतिबंधीत करण्याचे काम करण्यात आले होते. त्यासाठी लाकडे बांधून त्या भागावर नियंत्रण आणण्याचा एक प्रयत्न केला गेला. नियंत्रण किती यशस्वी ठरले हा एक वेगळा स्वतंत्र चर्चेचा विषय आहे पण त्यासाठी ते कंत्राट श्री सहयोग सेवा नांदेड अर्थात दडु पुरोहित यांना देण्यात आले. काही ठिकाणी बॅरीकेटस् लावले, काही ठिकाणी लाकडांनी तो भाग पुर्णपणे बंद करण्यात आला. अशा अनेक कामांमुळे प्रतिबंधीत क्षेत्रातील काम चालविण्यात आले. त्यावेळी अनेकांनी ती लाकडे तोडली. लाकडांचा वापर वेगळ्याच कामासाठी केला असेही घडले होते. पण ज्या पध्दतीने ते काम झाले होते. त्याचे एकूण बिल श्री सहयोग सेवा यांनी 2 कोटी 44 लाख 617 रुपये झाले असे दिले. कोरोना काळ संपला पण श्री सहयोग सेवाचे हे 2 कोटी 44 लाख 617 रुपयांचे बिल किलीअर होत नव्हते. त्या रक्कमेतील 9 लाख 99 हजार 510 रुपये तसेच 9 लाख 79 हजार 997 रुपये तसेच 4 लाख 99 हजार 952 रुपये तसेच 69 लाख 68 हजार 584 रुपये असे एकूण 94 लाख 68 हजार 43 रुपये पोलीस विभागाने श्री सहयोग सेवाला दिले होते. उर्वरीत राहिलेली रक्कम 1 कोटी 49 लाख 32 हजार 474 रुपये महानगरपालिका बिल या विषयावर सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली. हा सर्व खर्च कोविड-19 अनुदान आणि 14 व्या वित्त आयोगाने दिलेल्या व्याजातून किंवा जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडून प्राप्त होणाऱ्या निधीतून श्री सहयोग सेवा यांना देण्याच्या विषयाला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे श्री सहयोग सेवा यांचा प्रलंबित राहिलेल्या पैशांचा प्रश्न आज संपला आहे.
या विषयावर चर्चेत नगरसेवक दिपकसिंह रावत यांनी जोरदार आक्षेप नोंदवला. कोणतीही निविदा मंजुर करतांना एक पेक्षा जास्त कंत्राटदारांकडून त्याच्या संदर्भाच्या निविदा मागविल्या जातात आणि त्यातील कमी असलेल्या निविदेला मंजुरी दिली जाते असे सांगून श्री सहयोग सेवाने दिलेल्या बिलाला कोणीही प्रतिस्पर्धी नव्हता आणि अशा परिस्थितीत श्री सहयोग सेवाने दिलेला दर मान्य करत त्यांना हे काम देण्यात आले होते. त्यावर माझा आक्षेप आहे. सोबत दिपकसिंह रावत म्हणाले त्यावेळी लोखंडाचे बॅरीकेट तयार केले असते तरी एवढ्या निधीमध्ये हे सर्व काम पुर्ण करून कोरोना काळानंतर शिल्लक राहिलेल्या लोखंडाच्या खांबांना भंगारमध्ये विक्री केली असती तरी महानगरपालिकेचे एक कोटी रुपये वाचले असते असे सांगितले. पण दोन तृतीअंशपेक्षा जास्त बहुमत असलेल्या कॉंग्रेसच्या महानगरपालिकेत दिपकसिंह रावत यांचा आवाज कमजोरच ठरला आणि महानगरपालिकेच्या सर्वसामान्य सभेने 1 कोटी 49 लाख 32 हजार 574 रुपये श्री सहयोग सेवा अर्थात दडू पुरोहित यांना देण्याचा विषय मंजुर केला.
याप्रसंगी शहरात जवळपास सर्वच प्रभांगांमध्ये ड्रेनेज चेंबरवर झाकन नाहीत हा विषय गाजला. नगरसेवकांनी याबद्दल खंत व्यक्त केली की, आमच्या भागात लोक आम्हाला त्यासाठी शिव्या घालत आहेत. पण ड्रेनेज चेंबरवर झाकन उपलब्ध होत नाही. यासाठी प्रशासनाच्यावतीने हे काम करणारा कंत्राटदार उपलब्ध होत नाही असे उत्तर देण्यात आले. या पुर्वीच्या सर्वसाधारण सभेमध्ये सुध्दा ड्रेनेज चेंबरवरील झाकनांचा विषय गाजला होता. पण त्यावेळेस ड्रेनेज चेंबरची संख्या आणि झाकनांची संख्या यांची जुळवा जुळव झाली नव्हती. त्यामुळे तो प्रश्न प्रलंबितच होता. आजही प्रलंबितच आहे. सध्या सणांची संख्या भरपूर आहे त्यामुळे रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांची संख्या पण भरपूर आहे. ड्रेनेज चेंबरवर झाकन नसेल तर त्यामुळे होणाऱ्या अपघातांचा जबाबदार कोण हा प्रश्न पण मोठा आहे.
सिडकोचे नगरसेवक विनय गिरडे पाटील हे काही वर्ष उपमहापौर पण होते. त्यांनी उपस्थित केलेला प्रश्न पण गंभीर आहे. विनय गिरडे यांच्या सांगण्याप्रमाणे सन 2008 च्या गुर-ता-गद्दी या कार्यक्रमाच्या निधीतून सिडको परिसरात 4 पााण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या. त्यातील दोन टाक्यांमध्ये पाणी पुरवठा प्राप्त झाला. प्राप्त झालेल्या पाणी पुरवठ्यातून सिडको परिसरातील लोकांना काहीच फायदा होत नाही. उलट त्या पाण्याच्या टाक्यांमधून होणारा पाणी पुरवठा शहरातील दुसऱ्या भागांमध्ये होतो. उर्वरीत दोन पाण्यांच्या टाक्या रिकाम्याच आहेत. त्यामध्ये एक थेंब पाणी सुध्दा 2008 ते आज 2022 पर्यंत पडले नाही. आता तर त्या पाण्यांच्या टाक्यांना तडे जायला लागले आहेत. हा गंभीर प्रश्न विनय गिरडे पाटील यांनी अत्यंत जोरदारपणे मांडला. तेंव्हा महापौर आणि मनपा आयुक्त यांनी आम्ही दोघे तेथे जावून पाहणी करू असे आश्वासन विनय गिरडे पाटील यांना दिले. एकूण बहुसंख्येच्या जोरावर आजच्या सर्वसाधारण सभेत मनपा नगरसेवकांनी सर्वच विषय पास केले.
