नांदेड (प्रतिनिधी)- नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने हदगाव येथील प्रमोद शेट्टी यांच्या घरात झालेल्या दरोडा प्रकरणातील 11 लाख 74 हजार रूपयांचा ऐवज जप्त केल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकानुसार दिली आहे.
हदगाव शहरातील बसवेश्वर चौकात राहणाऱ्या प्रमोद शेट्टी यांच्या घरी जबर दरोडा झाला. या प्रकरणाचा तपास नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने दहा दिवसांत दरोडेखोरांना शोधले आणि त्यांच्याकडून 71 तोळे सोने आणि 70 हजार रूपये रोख रक्कम अशा फिर्यादीतील ऐवजापैकी 11 लाख 74 हजार रूपयांचा ऐवज जप्त केल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकात दिली आहे. सध्या हे तीन दरोडेखोर 2 ऑगस्ट 2022 रोजीपर्यंत पोलीस कोठडीत आहेत. या पोलीस कोठडीदरम्यान अटक केलेले दरोडेखोर लक्ष्मण पिराजी मेठकर वय 33, धंदा मुजरी रा. अर्धापूर सध्या चौफाळा नांदेड, दशरथ गंगाराम देवकर वय 50, रा. दगडवाडी ता. हदगाव जि. नांदेड, राजू लचीराम देवकर वय 39 रा. बटाळा ता.भोकर जि. नांदेड यांनी पोलीस कोठडीदरम्यान हा 11 लाख 74 हजार रूपयांचा ऐवज काढून दिल्याची माहिती आहे.
स्थानिक गुन्हा शाखेतील या गुन्ह्याचा तपास करणारे पोलीस उपनिरीक्षक आशिष बोराटे, पोलीस उपनिरीक्षक सचिन सोनवणे, पोलीस अंमलदार गुंडेराव करले, गंगाधर कदम, सखाराम नवघरे, विठ्ठल शेळके, रवी बाबर, मोतीराम पवार, संजीव जिंकलवाड, शेख कलीम यांनी ही कार्यवाही केली. पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी पोलीस पथकाचे कौतुक केले आहे.