नांदेड (प्रतिनिधी)- एका खंडणी प्रकरणात 62 वर्षीय व्यक्तीला धमकी दिल्याप्रकरणी एका गुन्ह्यात राजू बिल्डर यास स्थानिक गुन्हा शाखेने पकडून आणले आहे. या गुन्ह्यात अगोदर अक्षय भानुसिंह रावत यांना अटक झालेली आहे.
दि. 26 जून 2022 रोजी दत्तनगर भागातील सुदाम किशन राऊत वय 62 यांच्या तक्रारीवरून अक्षय रावत, राजू बिल्डर, अशोक उमरेकर, गुड्डू आणि 4-5 जणांविरूद्ध गुन्हा क्र. 246/2022 शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल झाला. पुढे हा गुन्हा तपासासाठी नांदेडच्या आर्थिक गुन्हा शाखेकडे वर्ग झाला. 4 जुलै 2022 रोजी अक्षय भानुसिंह रावत यांना अटक झाली होती. न्यायालयीन प्रक्रियेतून पुढे जात अक्षय भानुसिंह रावत हे सध्या जामिनीवर आहेत.
या प्रकरणातील ईतर लोकांना शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे, पोलीस अंमलदार बालाजी तेलंग, गणेश धुमाळ सायबर सेलचे दीपक ओढणे,राजेश सिटीकर,आर्थिक गुन्हा शाखेचे सुनील राठोड यांचे पथक बऱ्याच दिवसांपासून फिरत होते. या पथकाला देगलूरचे पोलीस अधीक्षक सचिन सांगळे यांचे मार्गदर्शन लाभले.या पथकाने राजस्थान,अकोला,बुलढाणा येथे राजू बिल्डरचा शोध घेतला. अखेर त्यांनी गुरुचरणसिंघ दिलीपसिंघ सिद्धू उर्फ राजू बिल्डरला शोधून काढले आणि पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हा शाखेच्या स्वाधीन केले आहे.
राजू बिल्डर विरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २३१/२०२२ भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० प्रमाणे सुद्धा दाखल आहे.त्या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक पुणे यांच्याकडे आहे.