नांदेड (प्रतिनिधी)- जुगार अड्ड्यावर दरोडा पडला आणि त्यानंतर आपली इभ्रत वाचविण्यासाठी पोलिसांनी दोन दिवसानंतर एका व्यक्तीची जबरी लूट झाली असा गुन्हा दाखल केला.हा प्रकार मुखेड शहरात घडला. असाच एक प्रकार नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात सुद्धा घडला होता. त्यात सुद्धा मोठी लूट झाली असताना फक्त सोन्याची चैन लुटल्याला गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुखेड येथे जुगार अड्ड्यावर टाकण्यात आलेल्या दरोडा प्रकरणात तीन दुचाकींवर 6 जण आले होते, अशी माहिती आहे.
मुखेड शहरातील लातूर रस्त्यावर एक मोठी जुगार अड्डा चालतो. या जुगार अड्ड्याचे मालक कोण आहे, कोणा-कोणाच्या आर्शीवादाने हा जुगार अड्डा चालतो हे काही लिहिण्याची गरज नाही. मागील रविवारी दि. 24 जुलै रोजी रात्री या जुगार अड्ड्यात मोठे नाट्य घडले. त्याठिकाणी तीन दुचाकी गाड्या आल्या त्यावर तोंडाला कपडे बांधलेले सहा जण बसले होते. त्या जुगार अड्ड्यावर या दरोडेखोरांनी हल्ला केला, त्यांच्याकडे बंदुका, तलवारी आणि कत्या अशी घातक हत्यारे होती. तेथे असलेल्या लोकांकडून त्यांनी 15 लाख रूपये रोख रक्कम व लोकांच्या गळ्यातील सोन्याच्या चैन, अंगठ्या हिसकावून घेतल्या. त्यांचे वजन 19 तोळे आहे. आजच्या हिशोबाने 19 तोळे सोन्याची किंमत 10 लाख 45 हजार रूपये होते. अनेकांना मारहाण करून दरोडेखोरांनी पळ काढला. याठिकाणी आलेल्या जुगाऱ्यांकडे इनोव्हा, ईरटीगा अशा गाड्या होत्या. जुगाऱ्यांना काही कळण्याअगोदरच काही मिनीटांत घडलेला हा दरोडा अत्यंत भयानक होता. पण ते सर्व जुगारी असल्याने त्यांना सुद्धा कोठे बोलण्याची जागा नव्हती. आपण वाचलोत याच आनंदात त्यांनी जुगार अड्ड्यावरून पळ काढला. 52 पत्त्यांचा जुगार काहीही केले तरी बंद होत नाही आणि चालणारे जुगार अड्डे दरोडेखोरांसाठी फुकटची लूट संधी तयार असते आणि याचाच फायदा दरोडेखोर घेतात. त्यापेक्षा शासनाने 52 पत्त्यांच्या जुगार अड्ड्यांना परवाना देऊन त्यांच्याकडून महसूल जमा करावा म्हणजे त्यांना कायदेशीर सुरक्षा तरी देता येईल. रविवारी घडलेल्या या प्रकाराची चर्चा सुरू झाल्यानंतर पोलिसांनी एका व्यक्तीला 2 जणांनी लुटल्याचा गुन्हा दोन दिवसानंतर मंगळवारी अर्थात 26 जुलै 2022 रोजी दाखल केला.