महाराष्ट्र लेख

“कुडमुड्या जोशीचा होरा ….!” किती खरा? किती खोटा?

मा. अजित दादा व मा.देवेंद्रजी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

मुंबई- दोघेही भावी मुख्यमंत्री. दोघेही राजकीय वारसा चालवत असले तरी सक्षम आहेत.महाराष्ट्राचा विकास करणे हा दोघांचाही जाहीरनामा आहे. दोघात फरक काय? दादांच्या राजकारणात सत्तेसाठी राजकारण,मुलालाही राजकारणात आणणे,पूर्वीच्या चुका दुरुस्तीसाठी राजकारण,असे ढोबळ हेतूही दिसतात.

देवेंद्रजी फडणवीस यांना सत्ता

मिळवून कोणाचा विकास करावयाचा आहे? त्यांनी सुरुवातीलाच जाहीर केले ते हिंदुत्ववादी,ब्राह्मण आहेत.

इतरांचा विकास करणे हे हिंदुत्ववादी ब्राह्मणाचे कर्म नाही. मला तरी आमच्या हिंदू धर्म ग्रंथात दिसले नाही.इतरांना ज्ञान रुपी प्रकाश देऊन शहाणे करणे व त्या मोबदल्यात दक्षिणा घेणे हेच एकमेव ‘कर्म’ आहे त्यांचे. तरीही देवेंद्र फडणवीस यांना सत्ता हवी आहे. कारण त्यांना जगाला दाखवायचे की ब्राह्मण ही ‘मास्टर रेस'(सर्वश्रेष्ठ जात, जमात) आहे व फक्त तीच इतरांचे भले/ विकास करू शकते. जगाला ज्ञान मार्ग दाखवू शकते. दुसरी गोष्ट सत्ता हातात आल्यावर सरसंघचालका समोर दुय्यम भूमिका घेऊन राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता(म्हणजेच ब्राह्मण सत्ता) मोठी व श्रेष्ठ आहे हे त्यांना दाखवायचे आहे.

याच फडणवीसांनी स्वतःला टग्या म्हणवून घेणाऱ्या आमच्या दादांना सकाळचा अल्पकालीन शपथविधी घ्यायला भाग पाडले.बाळासाहेबांच्या तालमीत तयार झालेल्या उठता बसता शिवरायांचे नाव घेणाऱ्या ‘टायगर’ शिंदे व मंडळींना दोन आठवडे लपायला भाग पाडले.आणखी बरंच!

दादा व देवेंद्रजीनी एकाच एसएससी बोर्डातून परीक्षा दिली मग दोघात इतका फरक कसा?

ब्राह्मण वर्ण म्हणून त्या समाजाची एकूण संस्कृती क्षत्रिय वर्णीयांपेक्षा खूपच वेगळी सांगितलेली आहे आमच्या धर्म ग्रंथात व तिचे आजही 70टक्के पालन होते.

कांही अपवाद वगळता घरातील संगोपन(upbrining) त्यांना खूप वेगळं बनविते.देवेंद्रजींचे हिंदुत्व हे फक्त प्रचारासाठी असत व्यक्तिगत जगणं पाश्चात्य पद्धतीचे आहे.

एक उदाहरण. तरुण वयात अजित दादा व उदयनराजे हे कोल्हापूरला कुस्ती शिकायला गेले होते तर देवेंद्र फडणवीस हे आधुनिक व्यवस्थापन शास्त्र शिकायला परदेशात गेले होते. व्यवस्थापन शास्त्र हे संघटना,नेतृत्व, प्रशासन कौशल्य(सॉफ्ट स्किल) शिकविते. तर कुस्ती ही दंडाचे आणि मांडीचे स्नायू बळकट करायला व एकावेळी एकाच प्रतिस्पर्ध्याला लोळवण्याचं कौशल्य शिकविते. त्यामुळे अशी पहिलवान मंडळी राजकारणात सिंहासारखे क्रूर बनतात एकट्या दुकट्या आपल्या गल्लीतील अगर शिवे पलीकडील राजकीय विरोधकाचा काटा काढतात व त्यातच धन्यता मानतात.

सत्ता मिळवून टिकविण्यासाठी नेत्याने सिंहासारखे क्रूर बनले पाहिजे व विरोधकांनी लावलेल्या सापळ्यात अडकू नये यासाठी कोल्ह्या सारखे धूर्त बनले पाहिजे असे ‘मकीव्हॅली’म्हणतो ते खरे आहे. कोल्ह्याचे गुण शिकावे लागतात.आपोआप येत नाहीत!

दादांच्या ताब्यात अनेक शिक्षण संस्था आहेत.शाळांची व विद्यार्थ्यांची संख्या वाढते पण गुणवत्ता नाही! शाळांचा अभ्यासक्रम आखण्याचे काम देवेंद्रजींची मंडळी करतात. चिकित्सा,चिंतन,संशोधन तसेच कांही नाविन्यपूर्ण प्रयोग करण्याची प्रेरणाच मारून टाकलेली आहे या अभ्यासक्रमातुन.पक्षात प्रचंड क्षमता असलेले कार्यकर्ते आहेत पण त्यांना पैलू पाडण्याचे प्रशिक्षण होताना दिसत नाही.

दादा व देवेंद्रजी यांचे राजकीय मॉडेल्स कालबाह्य झालेत कसे ते पाहू नंतर सविस्तर.निदान आज तरी दादा व मंडळी सोयीची वाटतात. कारण

त्यांचा आजचा दृष्टिकोन घटनेच्या बाजूचा वाटतो आणि त्रुटी असल्या तरी जनमताच्या रेट्या पुढे बदलू शकतात असा भाबडा का होईना पण आशावाद आहे.पण देवेंद्रजी आणि मंडळी माणसां माणसात वैरभाव,शोषण,विषमता, वाढवणारी आहेत.

दोघांचेही लाभार्थी म्हणतील”अहो कुडमुडे जोशी, तुमची औकात किती?बोलताय किती?”

हे मान्य पण ते दोघेही भविष्यातील आमचे मुख्यमंत्री आहेत.प्रत्येक मुख्यमंत्री आम्हा सामान्यांच्या जगण्यावर मोठाच बरा वाईट प्रभाव पाडीत असतात म्हणून त्यांचे मूल्यमापन करणे जनतेचा घटनात्मक अधिकार आहे. दोघांनाही व्यक्तिशः हार्दिक शुभेच्छा!

तसेच तिसऱ्या कालसुसंगत राजकीय मॉडेलचा विचार करू या. तीही आपली घटनात्मक जबाबदारी आहे!!

-सुरेश खोपडे

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *