ताज्या बातम्या नांदेड

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका व वृक्षमित्र फाऊंडेशन यांचा उपक्रम; पर्यावरण महोत्सव २०२२ व व्यंगचित्रांचे प्रदर्शन

नांदेड(प्रतिनिधी)-भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने नांदेड वाघाळा शहर मनपा व वृक्षमित्र फाऊंडेशनच्या वतीने पर्यावरण महोत्सवाचे आयोजन रविवार दिनांक ३१ जुलै २०२२ रोजी करण्यात आले आहे. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह स्टेडिअम परिसरात सकाळी ११ वाजता एक दिवसीय कार्यशाळा महापौर जयश्री निलेश पावडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. नांदेड येथील व्यंगचित्राचे संग्राहक, अभ्यासक मधुकरराव धर्मापुरीकर यांनी निवडलेल्या जागतिक स्तरावरील विविध व्यंगचित्रकारांच्या पर्यावरण या विषयावरील व्यंगचित्रांचे प्रदर्शन सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत रसिकांसाठी खुले असणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन मा. किशोर मल्लिकार्जुन स्वामी, स्थायी समिती, सभापती यांच्या शुभहस्ते सकाळी ९ वा. होणार आहे. घनकचरा व्यवस्थापन तज्ज्ञ श्री रामदास कोकरे, जिल्हा प्रशासन अधिकारी, नगर परिषद प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय लातूर यांचे पर्यावरण रक्षणासाठी घनकचरा व्यवस्थापन या विषयावर व्याख्यान होणार आहे. तसेच सांगली येथील नेचर कॉर्झर्वेशन सोसायटी चे डॉ. हर्षद दिवेकर यांचे निसर्ग संवर्धन काळाची गरज या विषयावर मार्गदर्शन लाभणार आहे. या सोबत डिस्क्वहरी व नॅट जियो वर काम केलेले सर्पमित्र निलमकुमार खैरे यांचे सर्पविषयी व्याख्यान होणार आहे.

 

या महोत्सवाच्या निमित्ताने शहरात मागील वर्षात लोकसहभागातून वृक्षलागवड करुन त्यांचे संगोपन करणाऱ्या कॉलनींना हरित कॉलनी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. शहरामध्ये उत्कृष्टरित्या घनवन प्रकल्पात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली या मध्ये उत्कृष्ठ वृक्षांची जोपासना करणाऱ्या व्यक्तींचा या पर्यावरण महोत्सवाच्या निमित्ताने सत्कार करण्यात येणार आहे. या मोहत्सवात विविध प्रकारचे स्टॉल्स ज्या मध्ये फुलझाडे, शोभेची झाडे, फळझाडे, लहान मोठी वृक्ष विक्रीसाठी सवलतीच्या दरात उपलब्ध राहणार आहेत व बाग निर्मितीचे मार्गदर्शन ही मिळणार आहे. तसेच विविध प्रकारची पर्यावरणपूरक औषधी, सेंद्रिय खते, अवजारे, उत्पादन यांचे स्टॉल व विक्री व प्रदर्शनासाठी सकाळी ९ ते ६ या वेळेत खुले राहणार आहे तसेच महिला बचत गटांचे खाद्यपदार्थांचे स्टॉल राहतील. या सोबतच शासनाच्या “हर घर तिरंगा” या मोहीमेअंतर्गत नागरीकांना तिरंगा ध्वज उपलब्ध होण्याच्या दृष्टीकोणातून बचत गटाचे एक स्टॉल लाउन तिरंगा ध्वज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. ही कार्यशाळा शहरातील नागरिक, निसर्गप्रेमी, विद्यार्थी, पर्यावरण अभ्यासक सर्वांसाठी निःशुल्क असुन यामध्ये तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

या महोत्सवात नांदेड मधील पर्यावरणप्रेमी नागरीकांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन नांदेड मनपा व वृक्षमित्र फाऊंडेशन तर्फे करण्यात येत आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *