नांदेड(प्रतिनिधी)-सन 2016 मध्ये वजिराबाद पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एका खून प्रकरणाचा तपास सन 2022 मध्ये दहशतवाद विरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आल्यानंतर त्यातील एकाला दशहतवाद विरोधी पथकाने पंजाब राज्यातील भटींडाच्या कारागृहातून नांदेडला आणले.आज दि.27 जुलै रोजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर.बी.राजा यांनी त्यास चार दिवस अर्थात 31 जुलै 2022 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
आजच्या प्रकरणाला समजून घेण्यासाठी ईतिहास समजून घेण्याची आवश्यकता आहे. फेबु्रवारी 2016 मध्ये बाफना टी पॉईंटवर सतविंदरसिंघ उर्फ सत्ता चरणसिंघ संधू या युवकाचा खून झाला. त्या संदर्भाने न्यायालयात दाखल झालेल्या दोषारोपपत्रात बरीच नावे होती. पण न्यायालयाने पुराव्यांची छाननी झाल्यानंतर एकाला जन्मठेपेची शिक्षा दिली होती आणि इतरांची सुटका झाली होती. या गुन्ह्यातील शिक्षा होण्याअगोदर सतविंदरसिंघ उर्फ सत्ताचा भाऊ हरविंदरसिंघ उर्फ रिंदा चरणसिंघ संधू यांने आपल्या कांही साथीदारांसोबत 19 ऑगस्ट 2016 रोजी नांदेड गाठले. सत्ताच्या खून प्रकरणात माळी बंधूचा हात आहे अशी शंका रिंदाला होती. त्या दिवशी नंदीग्राम सोसायटीमधील शाळेत आपल्या घरातील लेकरांना आणण्यासाठी बच्चीतरसिंघ बाबुसिंघ माळी हा युवक गेला होता. पण तेथे हरविंदरसिंघ उर्फ रिंदा आणि त्याच्या इतर तीन साथीदारांनी त्याला चार चाकी वाहनाच्या बाहेर येण्याची संधी न देता त्यावर बंदुकांनी हल्ला केला आणि त्याचा खून केला होता. या संदर्भाने आजपर्यंतच्या पोलीस तपासातील प्रगती अशी आहे की, त्या गुन्ह्यात हरविंदरसिंघ उर्फ रिंदाचे वडील चरणसिंघ संधू आणि त्यांच्या छोट्या मुलगा सरबज्योतसिंघ अशा दोघांना अटक झाली होती. न्यायालयात त्या दोघांसह इतर फरारी आरोपींविरुध्द दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
बच्चीत्तरसिंघ माळीचा खून मोकळ्या मैदानात करून तेथील शाळेत प्रवेश केला होता. त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये चार मारेकरी दिसत होते आणि प्रत्येकाच्या हातात अग्नीशस्त्रे होती. त्यानंतर त्यांनी नंदीग्राम सोसायटी येथून निघून ज्या ठिकाणी सत्ताचा खून झाला होता. त्या ठिकाणी उभे राहुन हवेत गोळीबार केला होता असे सांगितले जाते. यानंतर अजितसिंघ बाबूसिंघ माळी यांच्या तक्रारीवरुन रिंदासह इतरांवर विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 83/2016 दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा स्थानिक गुन्हा शाखेकडे तपासाला होता . पोलीस पथके नांदेड आणि नांदेडचा आसपासचा परिसर पिंजून काढत होते. पण मारेकरी पोलीसांना सापडले नाहीत.
त्यानंतर दोन दिवसांनी 21 ऑगस्ट रोजी नांदेड जिल्ह्यातील पोलीस अंमलदार हरजिंदरसिंघ बलवंतसिंघ चावला हे दहशतवाद विरोधी पथकात (एटीएस) कार्यरत होते. आज ते नांदेड जिल्हा पोलीस दलात पोलीस उपनिरिक्षक आहेत. 21 ऑगस्ट 2016 रोजी त्यांच्या एका घरगुती समारंभाचा कार्यक्रम यात्रीनिवास येथील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर सुरू होता. त्या ठिकाणी हरविंदरसिंघ उर्फ रिंदा आणि त्याचा एक सहकारी दोघे बंदुकांसह त्या कार्यक्रमात घुसले आणि पोलीस उपनिरिक्षक हरजिंदरसिंघ चावलाचा भाचा अवतारसिंघ उर्फ मन्नू जसवंतसिंघ गाडीवाले रा.सकोजीनगर यास पकडले. त्या ठिकाणी रिंदा आणि त्याच्या साथीदारांनी अनेक गोळ्या चालवल्या होत्या. त्यात कांही जण जखमी झाले होते. जखमी होणाऱ्यांमध्ये आजचे पोलीस उपनिरिक्षक हरजिंदरसिंघ चावला हे पण होते. अवतारसिंघ उर्फ मन्नू हा रोशनसिंघ माळीचा मदतगार आहे या कारणावरून रिंदा आणि त्याच्या दुसऱ्या साथीदाराने संगणमत करून त्याचा खून केला होता.
याबाबत वजिराबाद पोलीस ठाण्यात हरजिंदरसिंघ चावला यांच्या तक्रारीवरुन गुन्हा क्रमांक 133/2016 भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 307, 34 आणि भारतीय हत्यार कायद्याची कलमे यानुसार दाखल झाला होता. हा गुन्हा सुध्दा तपासाला तेंव्हा स्थानिक गुन्हा शाखेकडेच होता. पण सन 2022 पर्यंत या गुन्ह्यात काहीच प्रगती घडली नाही. कारण या प्रकरणातील मुळ मारेकरी हरविंदरसिंघ उर्फ रिंदा हा सिख दहशतवादी संघटना बब्बर खालसा याच्याशी संलग्नीत झाला म्हणून 12 मे 2022 रोजी तब्बल सहा वर्षानंतर हा गुन्हा तपास करण्यासाठी एटीएसकडे वर्ग करण्यात आला.
ज्यावेळी अवतारसिंघ उर्फ मन्नुचा खून करण्यात आला. त्यावेळी रिंदा सोबत असलेला दुसरा अनोळखी व्यक्ती हा दिलप्रितसिंघ ओमकारसिंघ डहाण (30) रा.राठी तहसील अनाथपुरसाहिब जि.रोपाड (पंजाब) हा असल्याची माहिती पोलीसांनी जमवली होती. सध्या तो दिलप्रितसिंघ हा पंजाब राज्यातील रोपाड जिल्ह्याच्या एका खून प्रकरणात भटींडा मध्यवर्ती कारागृहामध्ये शिक्षा भोगत असल्याची माहिती तपासादरम्यान पोलीसांना मिळाली. त्यानुसार नांदेड जिल्हा न्यायालयातून एटीएसने हस्तांतरण वॉरंट मिळवून दिलप्रितसिंघला नांदेडला आणले.
आज एटीएसचे अधिकारी सुनिल नाईक आणि इतर अधिकारी तथा पोलीस अंमलदारांनी दिलप्रितसिंघला न्यायालयात हजर केले. पोलीस तपासासाठी पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी केली. या प्रकरणात वापरलेली दुचाकी गाडी, अग्नीशस्त्रे जप्त करायची आहेत असे सादरीकरण सरकारी वकील ऍड. जोहिरे यांनी केली. युक्तीवाद ऐकून न्यायाधीश आर.बी.राजा यांनी दिलप्रितसिंघला चार दिवस अर्थात 31 जुलै 2022 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
