नांदेड(प्रतिनिधी)-प्रतिबंधात्मक कार्यवाहीसाठी निघालेली नोटीस रद्द करणे आणि मदत करण्यासाठी वर्ग-3 चे महसुल सहाय्यक यांनी 5 हजार रुपयांची लाच नांदेड तहसील कार्यालयात स्विकारल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने महसुल सहाय्यकाला ताब्यात घेतले आहे.
एका 73 वर्षीय तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली की, त्यांच्याविरुध्द फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 111 प्रमाणे त्यांना मदत करणे आणि ती नोटीस निकाली काढण्यासाठी महसुल सहाय्यक वर्ग-3 संदीपकुमार लक्ष्मणराव नांदेडकर (42) यांनी 5 हजार रुपये लाच मागीतली आहे. ही तक्रार 25 जुलै 2022 रोजी प्राप्त झाली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने 26 जुलै रोजी या लाच मागणीची पडताळणी केली आणि सायंकाळी 4.30 वाजेच्यासुमारास तहसील कार्यालयात महसुल सहाय्यक संदीपकुमार लक्ष्मणराव नांदेडकरने 5 हजारांची लाच स्विकारताच त्यास ताब्यात घेतले आहे.
ही सापळा कार्यवाही लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक डॉ.राजकुमार शिंदे, अपर पोलीस अधिक्षक धरमसिंग चव्हाण, पोलीस उपअधिक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक पखाले, जमीर नाईक, पोलीस अंमलदार हनमंत बोरकर, गणेश तालकोकुलवार, ईश्र्वर जाधव, मारोती सोनटक्के यांनी पुर्ण केली. वृत्त लिहिपर्यंत संदीपकुमार लक्ष्मणराव नांदेडकर विरुध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पुर्ण झाली नव्हती. हा गुन्हा वजिराबाद पोलीस ठाण्यात दाखल होणार आहे. या गुन्ह्याचे तपास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरिक्षक राहुल पखाले यांच्याकडे देण्यात येणार आहे.
नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी किंवा त्यांच्यावतीने खाजगी इसम (एजेंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस अधिक्षक डॉ.राजकुमार शिंदे मो. नं.- 9623999944., पोलिस उपअधीक्षक राजेंद्र पाटील मो. नं. 7350197197, टोल फ्रि क्रं. 1064 तसेच कार्यालय दुरध्वनी – 02462 253512 यांच्यावर संपर्क साधााव.
एखादा शासकीय कर्मचारी लाच घेतांना पकडला गेल्यानंतर त्याच्या प्रभारी अधिकाऱ्याची चौकशी व्हावी असा नियम आहे. महसुल सहाय्यक वर्ग-3 चे प्रभारी अधिकारी पाहिले तर प्रथम अवल कारकून, नायब तहसीलदार, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि महसुल विभागाचे सर्वात मोठे प्रमुख जिल्हाधिकारी असतात. या पैकी आता कोणाची चौकशी होणार याबद्दल मात्र स्पष्टता माहित नाही.