नवीन अधिक्षक अभियंता राजपुत
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ नांदेड अविनाश धोंडगे यांची नवीन सरकारने उचल बांगडी केली आहे. पण त्यांनी आपला तीन वर्षाचा कार्यकाळ पुर्ण केला आहे असे बदली आदेशात लिहिले आहे. सार्वजनिक बांधकाम मंडळ नांदेडच्या अधिक्षक अभियंता पदावर आता जबरदस्तीने बदली केलेले ग.हि.राजपुत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने आज 25 जुलै रोजी जारी केलेल्या आदेशात अगोदर बळजबरीने नांदेड कार्यकारी अभियंता पदाच्या जागेवरुन बदली करण्यात आलेले अभियंता राजपुत यांना पदोन्नती देण्यात आली आहे. पदोन्नती त्यांना पुर्वीच मिळाली होती. परंतू हे पदोन्नतीच्या महाराष्ट्र मेरीटाईमबोर्ड मुंबई येथील अधिक्षक अभियंता पदावर हजर झाले नव्हते. दरम्यान महाराष्ट्र राज्यात शासन बदलले आणि ज्या प्रमाणे तव्यावर पोळी उलटून सुलटून भाजली जाते तसा प्रकार सुरू झाला आणि नांदेडचे अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे यांच्या जागी राजपुत यांना नियुक्ती देण्यात आली आहे. त्यांना नवीन नियुक्ती अद्याप देण्यात आलेली नाही. त्याबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित केले जातील असे या बदली आदेशात लिहिले आहे. अविनाश धोंडगेमुळेच ग.हि.राजपुत यांची बदली करण्यात आली होती अशी चर्चा त्यावेळी झाली होती. सांगवी येथे जुन्या पुलाला नवीन स्वरुप दिल्यानंतर त्या पुलाच्या उद्घाटन कार्यक्रमात राजपुत हजर होते आणि उद्घाटन पुर्ण होताच त्यांची बदली करण्यात आली होती.
राजपुत यांनी मुंबईच्या महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड ही आपली पदस्थापना बदलून देण्याची विनंती केली होती. त्याला अनुसरून राजपुत यांना नांदेडच्या सार्वजनिक बांधकाम मंडळातील अधिक्षक अभियंता पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. या आदेशावर सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र राज्यचे कार्यासन अधिकारी गंगाधर गायकवाड यांची स्वाक्षरी आहे.
अविनाश धोंडगे यांची बदली आताच का झाली यामागील राजकारण समजण्यासाठी किंबहुना कळण्यासाठी थोडावेळ लागेल. पण काही जणांनी कांही लोकांची नावे लिहुन व्हॉटसऍप संकेतस्थळावर ती चर्चा करायला सुरूवात केली आहे. राजपुत यांची बदली झाली त्यावेळी असलेली परिस्थिती, अभियंते आणि कंत्राटदार यांच्या गोटात आता घबराट पसरली आहे. कारण राजपुतचे साहेब असलेल्या अविनाश धोंडगेने त्यांचे कधीच काही ऐकले नव्हते. गंगापूरचे आ.प्रशांत बंब यांनी सुध्दा अविनाश धोंडगे यांच्या कार्यपध्दतीवर भरपूर आसुड ओडले होते. एकंदरीत घडलेला हा प्रकार बदली म्हणून नवीन नाही पण आता नवीन काय-काय घडेल हा मात्र एक चर्चेचा विषय आहे.