शेळ्या विकून माणसाचा उपचार सुरु
नांदेड (प्रतिनिधी)-मुखेड परिसरातील काही गावात बनावट दारुचा महापुरू वाहत आहे आणि त्यामुळे अनेकांना आपला जीव नाहक धोक्यात घालावा लागत आहे. असाच एक युवक सध्या बनावट आणि विषारी दारु प्राशनामुळे अत्यंत दुर्धर परिस्थितीत उपचार घेत आहे. दारु कोठून येते, कोण विकतात. कोणाची जबाबदारी आहे ही दारु विक्री थांबविण्याची त्या सर्वांनी याबाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे.
हनमंत खंडू कांबळे रा.जांभळी ता.मुखेड यांनी जिल्हाधिकारी नांदेड आणि पोलीस अधिक्षक नांदेड यांना पत्र दिले आहे. या पत्रानुसार जांभळी गावात जाहिराबाई, गुणाबाई आणि शंकर ही मंडळी बनावट आणि विषारी दारु विक्री करतात. ही दारु मुखेड, वसुर, होनवडज या भागात युरीया खतापासून व बनावट गोळ्या टाकून तयार केली जाते. कधी कारने तर कधी ऍटोने ही अवैध दारु आणली जाते. या दारुमुळे अनेक लोकांना त्रास झाला आहे. कांही लोकांना मृत्यूपण आला आहे. त्यात जांभळी गावातील बजरंग दिगंबर हिवराळे यांचा मृत्यू सुध्दा विषारी दारु प्राशनामुळेच झालेला आहे.
अर्जदार हणमंत कांबळे यांचा भाऊ शंकर कांबळे याने ही विषारी आणि बनावट दारु प्राशन केली. त्यानंतर त्याला उलट्या होवू लागल्या त्यात रक्तही पडू लागले. पुढे त्यांना मुखेड येथील डॉ.पत्तेवार यांच्या दवाखान्यात उपचार दिला. पण तेथे उपचार होत नाही असे सांगितल्याने त्याला नांदेडच्या एका खाजगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहे. नांदेडला आणल्यावर विषारी आणि बनावट दारु पिल्यामुळे पोटाच्या आतील भाग, तोंेड आणि आतडे जळून गेल्याचे डॉक्टर सांगत आहेत. शंकर कांबळेची दुर्धर परिस्थिती पाहुन मी माझ्याकडे असलेल्या चार शेळ्या विकून त्याचा उपचार करत आहे. त्यानुसार या जांभळी गावात येणारी ही विषारी दारु कोण आणतो, कोण तयार करतो आणि समाजाच्या युवकांना कमी पैशांमध्ये नशेची सवय लावतो या सर्व लोकांवर कार्यवाही करावी. विषारी दारुमुळे सध्या उपचार घेणाऱ्या शंकरला तीन लहान बालके आहेत.
नियंत्रक विभाग काय करत आहेत?
एखाद्या अवैध वस्तुचे उत्पादन होत आहे आणि त्यातून समाजामध्ये मृत्यू वाटले जात आहेत. ही बाब जिल्हा प्रशासनाला माहित नाही हे आश्चर्य व्यक्त करण्यासारखे आहे. प्रत्येक अवैध बाबीवर लक्ष देण्याची विविध विभागांची जबाबदारी आहे. ज्यात विषारी दारु बद्दल राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस विभाग ही मोठी विभागे आहेत. ज्यांना सर्वकांही माहिती हवे असे अपेक्षीत आहे. पोलीस विभागात तर जे काम स्थानिक पोलीसांना करता येत नाही, त्यांचा वचक ज्या ठिकाणी नाही त्या ठिकाणी वचक ठेवण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा प्रत्येक जिल्ह्यात कार्यरत आहे. तशीच नांदेड जिल्ह्यात सुध्दा आहे. काय करत आहेत मग हे विभाग हा प्रश्न शंकर कांबळेच्या उपचारामुळे समोर आला आहे.