नांदेड (प्रतिनिधी)-पोलीसांविरुध्द लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारी करू नका नाही तर तुमच्या मृत्यूची सुपारी दिली जाईल असे घटनाक्रम घडायला लागले आहेत. आजपर्यंत याचा कोणी बळी गेला की, नाही याची माहिती प्राप्त झाली नाही. पण दक्षता नक्कीच घ्या यासाठी आम्ही मेहनत घेत आहोत.
मागील काही महिन्यांमध्ये काही पोलीसांविरुध्द काही नागरीकांनी लाच मागणीच्या तक्रारी केल्या. त्यात कांहींना सापळा कार्यवाहीत अटक झाली. कांहीचे सापळे अयशस्वी झाले अशा प्रकारे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग काम करते. त्यात यश येणे न येणे, संबंधीत अपचारी पोलीसावर कार्यवाही होणे किंवा न होणे हा शेवटी त्याच्या -त्याच्या नशीबाचा भाग आहे. कधीच कोणत्याही व्यक्तीने मी फसलो, मला फसवले गेले, मी त्यातला नव्हेच अशीच भुमिका घेतलेली आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे कोणाशी व्यक्तीगत वैर आहे काय? याचा अभ्यास केला तर याचे उत्तर नकारात्मकच मिळेल. ज्या व्यक्तीवर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने भ्रष्टाचारासंंबंधीत, अपसंपत्तीबाबत कार्यवाही केली. त्यांनी कधीच हा विचार केला नाही. की, आपले काय चुकले? सध्याच्या युगात मीच खरा आहे, मीच सत्यवान आहे, मीच हरिश्चंद्र आहे अशा भावना प्रत्येकात असतात. एक जुनी उक्ती आहे. हमाम में सब……. ही उक्ती खरीच आहे. त्यात काही जण थोडासा बदल करतात आणि बदल करणाऱ्यांना जग मुर्खात काढते. मी कसा श्रीमंत आहे, मला काय कमतरता आहे असे सांगून मी तर पैसे कधी घेतच नाही, मला पैशाची काय गरज असे सांगून आपल्या जीवनाचा गाडा चालविण्यात सर्वांना रस आहे. अशा परिस्थितीत कायद्याच्या दृष्टीकोणातून सत्याचा शोध घेण्याची जबाबदारी लोकशाहीमध्ये न्यायालयांवर आहे. त्यांच्यासमोर आलेल्या पुराव्यांच्या छाननीतून न्यायालये सत्याचा शोध घेतात आणि त्यांच्या समक्ष आलेल्या पुराव्याच्या आधारावर अपचारीला शिक्षा देतात. मग एखादी कार्यवाही झाली असेल तर या प्रक्रियेतून जाण्याची तयारी प्रत्येकाने ठेवायला हवी. आपल्याला हवे आहे ते सर्वच मिळावे असे होत नाही. म्हणून या जगात झालेल्या जखमांवर सर्वात प्रभावी मलम वेळच आहे. तरी पण त्या वेळेची वाट पाहण्याची इच्छा आता लोकांमध्ये शिल्लक राहिली नाही. ज्या लोकांना समाजातील, कायद्याच्या दृष्टीकोणातील दोन नंबरची कामे करायची आहेत. त्यांनी एक तर कामे करायला नको किंवा तक्रार कारायला नको. लाच लुचपत प्रतिबंधक विभाग त्याचे काम दोन नंबरचे आहे असा विचार करत नाही कारण तो त्यांच्याकडे तक्रारदार असतो. पण तो दोन नंबरचे काम करत असेल, त्यासाठी इतरांना पैसे देत असेल अशा परिस्थितीत सुध्दा त्याच्यासोबत वागणूक कशी असावी हा ही एक मोठा प्रश्न तक्रारी करणाऱ्यांचा असतो. पैसे पण द्या आणि भिकाऱ्यासारखी वागणूक मिळते ही सुध्दा बाब त्यांना चुकीची वाटते. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कार्यवाही केलेल्या कांही पोलीसांचे नातलग सांगतात. “कोण घेत नाहीत पैसे ‘ या प्रश्नाचे उत्तर सकारात्मक असेल तरी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कार्यवाहीमध्ये बोलणाऱ्याच्या लाडक्या माणसाचा क्रमांक लागला हे सुध्दा तेवढेच खरे आहे. इतरांचा लागला नाही. ही त्या नाण्याची दुसरी बाजू आहे.
एका व्यक्तीने दुरध्वनीवरून सांगितले की, अशाच एका पोलीसावर एका तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनंतर तो पोलीस सापळा कार्यवाहीत अडकला. कायद्याच्या दृष्टीकोणातून ही कार्यवाही पुर्ण होण्यासाठी जो कालखंड लागतो तो पर्यंत हाताची घडी तोंडावर बोट ही आम्ही लहानपणी शाळेत शिकलेली प्रक्रिया पार पाडली तरी बहुतेक सर्व समस्या संपतात. पण असे करण्याची तयारी कोणाची नाही. आणि हीच सर्वात मोठी समस्या आहे. त्यामुळेच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केलेल्या कोणत्या तरी एका माणसाचा जीव घेण्याची सुपारी देण्यात आल्याची खळबळजनक माहितीची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे नागरीकांनी पोलीसांविरुध्द एक तर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करू नये किंवा गुपचूप त्यांचे काय पैसे द्यावे लागतात ते द्यावेत कारण जीवनापेक्षा मोठे काही नाही. या सर्व शब्दप्रपंचामध्ये अखेर पैशांसाठीच सर्व काही चालते हेच दाखवायचे आहे. आपली नोकरी ही सेवा नसून आपली वडीलोपार्जित संपत्ती असल्यागत ही लोकशाही सुरू आहे. लोकांसाठी-लोकांकडून लोकांनी चालविलेले राज्य म्हणजे लोकशाही या सर्व शब्दांना काळीमा फासला जात आहे. तेंव्हा मृत्यूपेक्षा ते काम करू नका ज्या कामासाठी पोलीसांना पैसे द्यावे लागतील किंवा जगायचे असेल तर पैसे द्या, सर्व कांही गुपचूप सहन करा हेच सांगायचे आहे.
