नांदेड(प्रतिनिधी)- 50 हजार रूपये मागितल्यानंतर त्यास नकार देणाऱ्या व्यक्तीवर दोन जणांनी तलवारीने हल्ला करून त्यास गंभीर दुखापत केली. हा प्रकार मेंढका ता. मुदखेड येथे घडला.
सतिश शामराव हाटकर हे 17 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता मेंढका येथे नरवडे यांच्या किराणा दुकानाजवळ थांबले असताना अविनाश सिद्धार्थ निखाते आणि संजय गणपत निखाते या दोघांनी त्यांना 50 हजार रूपये मागितले. माझ्याकडे पैसे नाहीत आणि कशाचे पैसे मागतोस अशी विचारणा केली असता अविनाश निखातेने आपल्या पाठीमागील खोवलेली तलवार काढली आणि सतिश हाटकरच्या डाव्या दंडावर मारली. तो वार अडवण्यासाठी हात वर केला असता डाव्या हाताच्या तळ हातावर आणि उजव्या छातीवर गंभीर दुखापत झाली. सोबतच डोक्याच्या उजव्या बाजूला सुद्धा तलवार लागली आणि जखमा झाल्या. भोकर पोलिसांनी सतिश हाटकरच्या तक्रारीवरून गुन्हा क्र. 252/2022 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार लक्षटवार करीत आहेत.