नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील डॉक्टर्सलेन, गोवर्धनघाट रोड येथील भास्कर हॉस्पीटलसमोर एका महिलेला तीन जणांनी बोगस पोलीस बनून त्यांचे जवळपास 8 तोळे सोने गायब केले आहे. या सोन्याची किंमत जवळपास 4 लाख रुपये आहे.
आज दुपारी 12 वाजेच्यासुमारास बिनीता बसंतकुमार बैद्य (मुथा) (वय75) रा.बोरबन फॅक्ट्री या आपल्या घराकडे पायी जात असतांना तीन काळ्या रंगाचे व्यक्ती, उंची जास्त असलेले, काळे जॅकीट घातलेले त्यांना भेटले आणि म्हणाले समोर खून झाला आहे त्यामुळे कोणीच अंगावर सोने परिधान करून इकडे-तिकडे फिरू नये म्हणून आम्ही येथे थांबलो आहोत. त्या चोरट्यांनी त्यांच्या सोन्याच्या चार बांगड्या जवळपास सहा तोळे वजनाच्या आणि एक ते दीड ग्रॅम गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र काढायला लावले. त्यांनी तो सर्व सोन्याचा ऐवज एका दस्तीत बांधून आपल्या बॅगमध्ये ठेवला. त्यावेळी या भामट्यांनी महिलेला आम्ही बरोबर ठेवतो म्हणून ती सोन्याची पोटली काढली आणि तशीच दिसणारी दुसरी पोटली त्यांच्या बॅगमध्ये ठेवली. घरी गेल्यावर हा सर्व प्रकार 75 वर्षीय महिलेच्या लक्षात आला. त्या बॅगमधील पोटलीमध्ये चोरट्यांनी चार बेन्टेक्सच्या बांगड्या आणि दोन दगड ठेवलेले होते. या घटनेची माहिती मिळताच वजिराबादचे पोलीस पथक तसेच स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस पथक घटनास्थळी पोहचले आणि ते या प्रकरणाचा बारकाईने शोध घेत असून चोरटे कोठे गेले असतील याबद्दल सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.
