नांदेड(प्रतिनिधी)-मिल रोडवरील शिवशक्तीनगर भागात मलनिसारण वाहिनीच्या कामानंतर तयार झालेली दुर्धर परिस्थिती पाहता त्या भागावर सिमेंट कॉंक्रीट करण्यात यावे अशी मागणी करणारे निवेदन शिवशक्तीनगर भागातील नागरीकांनी मनपा आयुक्तांना दिले आहे.
शहरातील मिल रोडवर शिवशक्तीनगर, टी.व्ही.एस.शोरुम ते बसस्थानकापर्यंतची भिंत तसेच धम्मनगरपर्यंत मागील महिन्यात मलनिसारण वाहिनीचे काम करण्यात आले. त्यासाठी झालेले खोदकाम आजपर्यंत तसेच आहे. त्यामुळे रस्त्यावरुन येणे-जाणे अवघड झाले आहे. मलनिसारण वाहिनीसाठी करण्यात आलेले खोदकाम आणि त्यानंतर त्यावर करावे लागणारे सिमेंट कॉंक्रीट अद्याप तयार झाले नाही. म्हणून या भागातील नागरीकांचा जीव धोक्यात आला आहे.
रखडलेले काम लवकरात लवकर पुर्ण करून नागरीकांच्या जीवीताचा धोका टाळा असे एक निवेदन शिवशक्तीनगर भागातील नागरीकांनी मनपा आयुक्तांना दिले आहे. या निवेदनावर एन.व्ही.देशमुख, सौ.कहाळेकर, नारायण नारळे, लक्ष्मी अंबे, राजेश गायकवाड, शिवानंद सुर्यतळे, रणजित देशमुख, प्रल्हाद देशमुख आदी नागरीकांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
