नांदेड(प्रतिनिधी)-पंढरीनाथाची वारी करून आल्यानंतर बरडशेवाळा ता.हदगाव येथे झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
बामणी फाटा ता.हदगाव येथील सतिश मसाजी टोपलेवार, संतोष कोंडबा टोपलेवार आणि सुरेखा संतोष टोपलेवार हे मोलमजुरी करून जगणारे कुटूंब तेथे राहतात. काही दिवसांपुर्वीच आषाढी हा महोत्सव संपला. त्या दरम्यान त्यांचे वडील कोंडबा टोपलेवार हे पंढरपूर येथै जावून विठूरायाचे दर्शन घेवून परत आले होते. आपल्या पंढरपूर वारीचा प्रसाद ते इतर भक्तांमध्ये वाटत असतांना एका अज्ञात वाहनाच्या धडकेत संतोष टोपलेवार, सुरेखा टोपलेवार आणि सतिश टोपलेवार यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच मनाठाचे सहाय्यक पोलीस निरिक्षक विनोद चव्हाण हे आपल्या सहकारी पोलीस अंमलदारांसह घटनस्थळी हजर झाले. मरण पावलेल्या व्यक्तींना पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी त्यांनी उपजिल्हा रुग्णालय हदगाव येथे पाठवले. टोपलेवार कुटूंबियांना पंढरीनाथाचे दर्शन घेवून आल्यावर काळाने झडप घातली आणि त्यात तीन जण मरण पावले आहेत. एकाच कुटूंबातील तीन व्यक्ती मरण पावल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.