नांदेड(प्रतिनिधी)-आजच्या सूर्योदयासोबत वरुण राजाने उसंत घेतली. सुर्याचे दर्शन नागरीकांना चौथ्या दिवशी झाले. लोकांनी आजची परिस्थिती पाहुन देवाला हात जोडले आहेत आणि आता तरी थांब रे बाबा अशी विनंती केली आहे. चार दिवसानंतर आज रस्त्यांवर गाड्या धावत होत्या. गर्दी दिसत होती. त्यामुळे आपण कोणत्या तरी तुरूंगातून बाहेर आलोत अशी जनतेत भावना आहे. तरी पण आभाळ आजही थोडेफार काळसर दिसत आहे. त्यामुळे पुढे वरुण राजा काय करेल याचा कांही एक नेम नाही. सरासरी पावसाच्या तुलनेत तीन दिवसात सरासरीपेक्षा खुप जास्त पाऊस झाला आहे.
नांदेड जिल्ह्यात आणि राज्यात गेली तीन दिवस पाऊस सुरूच होता. 72 तास पाऊस पाहुन लोक सुध्दा तुरूंगात राहिल्यासारखे कोंडले गेले होते. कांही दुर्घटनापण घडल्या आहेत. जवळपास 80 गावांचा संपर्क पावसाने तोडला होता. पण आजचा सुर्योदय झाला आणि वरुण राजाने आपल्या बरसण्यावर अर्धविराम लावला आहे. त्यामुळे जनता सुखावली आहे. आजच्या परिस्थितीत आणि पुढे थोडीशी उसंत घे रे बाबा अशी विनंती नागरीक ईश्र्वराकडे करत आहेत. जिल्हयाच्या सरासरी पाऊस मानाने मागील तीन दिवसात सरासरीपेक्षा खुप जास्त पाऊस झालेला आहे. शेतकऱ्यांची सुध्दा आवस्था वाईटच आहे. पावसाने उसंत घेतली तर त्यांनी पेरलेल्या पिकांची परिस्थिती कळेल. पण नदीकाठी, नाल्यांच्या काठी असलेल्या शेतातून पावसाने जमीन खरडून काढली आहे. त्यामुळे त्या शेतकऱ्यांची तर अवस्था बिकटच आहे.
जिल्ह्यात गुरुवार 14 जुलै 2022 रोजी सकाळी संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे, कंसात एकूण पाऊस : नांदेड- 48.20 (576.50), बिलोली-88.60 (602.40), मुखेड- 45.30(525.60), कंधार-44.50 (591.70), लोहा-43.40 (549.30), हदगाव-74.60 (534), भोकर- 109 (661.10), देगलूर-39.10 (493.80), किनवट-48.90 (552.30), मुदखेड- 107.10 (746.60), हिमायतनगर-112 (780.20), माहूर- 57.50 (482.60), धर्माबाद- 62 (572.80), उमरी- 107.90 (700.90), अर्धापूर- 78.50 (568.50), नायगाव- 83.70 (535.40) मिलीमीटर आहे.