नांदेड,(प्रतिनिधी)- बिलोलीचे सहायक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर कुंटूर पोलिसांनी कहाळा आणि बरबडा येथे जुगारावर धाड टाकून १४ जुगारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सहायक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांना प्राप्त झालेल्या गुप्त माहिती नंतर त्यांनी कुंटूरचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव पुरी यांना त्या दोन जुगार अड्ड्यांवर कार्यवाही करण्याचे आदेश दिले.त्यानुसार महादेव पुरी , पोलीस अंमलदार रमेश निखाते, संतोष कुमरे , मोहन कंधारे , अशोक घुमे चालक रामेश्वर पाटील यांनी बरबडा गाठले.तेथे बाबाराव विळेगावकर, देविदास भंडरवाड,आनंदा पोतनवाड,बालाजी दिवडे,गोविंद जाधव, गोविंद कोंढवार,आनंदा गिरे,शिवाजी पवार हे कोंडीबा भांडरवड याचे टिन शेडमध्ये ५२ पत्त्यांचा तिर्रट हा जुगार खेळात होते.त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य आणि १५ हजार ७५० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली.या लोकांविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४ आणि ५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास पोलीस अंमलदार रमेश निखाते हे करीत आहेत.
तसेच पोलीस पथकाने कहाळा शिवारात गंगाधर मेघळ, व्यंकटी हेडगे, श्रीकांत हेंडगे,अशोक वाघमारे,प्रभाकर हेंडगे, पंडीत हेंडगे हे सर्वजण तिर्रट जुगार खेळत होते.त्यांच्याकडून ९ हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.या लोकांवर सुद्धा जुगार कायदा कलम ४ आणि ५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास पोलीस अंमलदार रमेश निखाते हे करीत आहेत.
सहायक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी आता जुगाऱ्यांवर आपली करडी नजर सुरु केली आहे.जुगाराचा धंदा करून कमी वेळेत श्रीमंती कडे जाण्याचा मार्ग सर्वाना सहज वाटतो.पण त्यातून काही मंडळी गब्बर होतात आणि खेळाडू नेहमीच आपली संपत्ती गमावत असतात.