नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेले दोन चोरीचे दोन गुन्हे आणि विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक असे तीन गुन्हे स्थानिक गुन्हा शाखेने उघडकीस आणतांना तीन चोरट्यांना जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून जबरी चोरी करतांना लुटलेले दोन मोबाईल जप्त केले आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार दि.14 मे 2022 रोजी इरबाजी अशोकराव काळे यांना हस्सापूर शिवारात खंजीरचा वार करुन त्यांची लुट करण्यात आली होती. एक मोबाईल आणि 7 हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन चोरट्यांनी लुटली होती. असाच एक गुन्हा पुढे विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आणि एक पुन्हा नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. याबाबत स्वतंत्र तीन गुन्हे दाखल आहेत.
स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांना प्राप्त झालेल्या महितीनुसार हे चोरटे नांदेड शहरातीलच रहिवासी आहेत. यानंतर पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे, सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग भारती, पोलीस उपनिरिक्षक जसवंतसिंघ शाहु, पोलीस अंमलदार बालाजी यादगिरवाड, गणेश धुमाळ आणि हनुमानसिंह ठाकूर यांना त्या चोरट्यांना पकडण्यासाठी पाठविण्यात आले. पोलीस पथकाने राजसिंघ सुंदरसिंघ सिरपल्लीवाले (19), श्री सुधीर चव्हाण (19) आणि सतिश परमेश्र्वर माने (21) अशा तीन युवकांना पकडले. त्यांच्याकडून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्याह द्दीत घडलेल्या चोरीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. त्याची किंमत 10 हजार रुपये आहे. या तिघांच्या नावासमोर त्यांचा व्यवसाय मजुरी असा लिहिलेला आहे. या चोरट्यांना पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे आणि विमानतळ पोलीस ठाणे यांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. तीन जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणणाऱ्या पोलीस पथकाचे पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी कौतुक केले आहे.
