नांदेड(प्रतिनिधी)-काय ते रस्ते, काय ते खड्डे, काय ती टक्केवारी सर्वात काही ओकेमध्ये असे म्हणत नगरसेवक बापूराव गजभारे यांनी आजच्या महानगरपालिकेतील सर्वसाधारण सभेत महापौरांकडे भिरकावलेली पत्रे आजच्या सभेतील महत्वपूर्ण घटनाक्रम ठरला. तसेच प्रशासन आणि पदाधिकारी यांच्यातील वादच चर्चेत येत होते. विषय पत्रिका सुरू करण्यावरुन सुध्दा वाद झाला. पहिल्याच पावसात नांदेडची झालेली बकाल अवस्था पण त्यावर निर्णय काही झालाच नाही. मनपा आयुक्तांनी सभा असतांना मुंबईला जाणे हा सभागृहाचा अपमान आहे असे बोलले गेले. सर्वात महत्वपुर्ण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव आला तेंव्हा अभिनंदनापेक्षा नांदेड शहराच्या समस्या जास्त महत्वपूर्ण आहेत असे बोलत अभिनंदनाच्या ठरावाला बगल देण्यात आली.
आज महानगरपालिकेच्या सभागृहता दुपारी 3 वाजता महानगरपालिकेच्या सर्वसाधरण सभेला सुरूवात झाली. महापौर जयश्री पावडे, उपमहापौर अब्दुल गफार, अतिरिक्त आयुक्त बाबासाहेब मनोहरे, नगरसचिव अजितपालसिंघ संधू यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. सुरूवातीच्यावेळेत फक्त 30 नगरसेवक होते. मग हळूहळू ही संख्या 45 वर पोहचली. विषय पत्रिकेमध्ये नगरसेवकांच्यावतीने 11 विषय होते. तर प्रशासनाच्यावतीने चर्चेसाठी आलेले 9 विषय होते. सर्व प्रथम स्थायी समितीचे सभापती किशोर स्वामी यांचे वडील मल्लीकार्जुन स्वामी यांचे निधन झाल्याबद्दल सर्व नगरसेवकांनी त्यांना श्रध्दांजली अर्पण केली.
सुरूवात नांदेड शहरातील बकाल अवस्थेपासून झाली. त्यात पिण्याचे पाणी वेळेवर येत नाही. रात्री-बेरात्री पाणी येते ही काय अवस्था आहे, ड्रेनेजचे पाणी गुडघ्यापर्यंत आले आहे. मनपाच्या शाळांचे अवस्था वाईट आहे. शहरातील मनपा दवाखान्यांमध्ये असलेल्या असंख्य असुविधा नगरसेवकांनी मोजल्या. यामध्ये मसुद खान, आनंद चव्हाण, उमेश चव्हाण, शमीम अब्दुला, बापूराव गजभारे, संजय पांपटवार, फारुख अहेमद ऍड.महेश कनकदंडे, सौ.नेरलकर, सौ.वैशाली देशमुख, दिपकसिंह रावत आदींनी जोरदार आक्षेप घेतले. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना कामे सांगून पाठपुरावा केल्यानंतर सुध्दा पिण्याच्या पाणी वेळेवर नाही, साफसफाई नाही, ड्रेनेज समस्या आहेत यासाठी आम्हाला जनता शिवीगाळ करते असा सुर नगरसेवकांचा होता. या प्रसंगी शिवाजीनगर आणि हैदरबाग दवाखान्यात असुविधांबद्दल सन्मान कंस्ट्रक्शन या कंत्राटदाराला सुचना दिली आहे असा खुलासा करण्यात आला. तेंव्हा सन्मान कंस्ट्रक्शनने नांदेड शहरातील नागरीकांचे अनेकवेळे नुकसान केले आहे, नागरीकांन फसवले आहे. तेंव्हा त्यास ब्लॅकलिस्ट करा किंवा त्याविरुध्द कार्यवाही करा अशा सुचना महापौर जयश्री पावडे यांनी दिल्या.सन्मान कंस्ट्रक्शनच्या सात पिढ्यांचे भले करण्यासाठीच महानगरपालिकेतील पदाधिकारी आणि अधिकारी नेहमीच सज्ज असतात अशा आशयाचे लिखाण आम्ही अनेकदा केलेले आहे.
आयुक्त मला सांगून मुंबई गेले नाहीत यावर महापौर जयश्री पावडे भरपूर रागवल्या. यावर बाबासाहेब मनोहरे यांनी आयुक्तपदाचा पदभार माझ्याकडे नाही. पण महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत वरिष्ठ अधिकारी म्हणून मी उपस्थित आहे. तरीपण मी सभा संपल्यानंतर आयुक्तांशी चर्चा करून नगरसेवक सदस्यांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहचवेल आणि योग्य तो निर्णय घेईल असे सांगितले. महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक ओरडतात आणि गप्प बसतात या भावनेला आता प्रशासनिक अधिकाऱ्यांनी बदलेले पाहिजे असे महापौर जयश्री पावडे यांनी सांगितले. वेगवेगळ्या विभागांच्या नावावर टोलेबाजी करून आपली जबाबदारी झटकण्याचा प्रकार महानगरपालिकेत नेहमीच होतो. त्यासाठी सर्वांनी समन्वयकपणे एक दुसऱ्याशी चर्चा करून महानगरपालिका आपली आहे आणि सर्वच काम आपले आहेत अशी भावना ठेवायला हवी अशी सुचना करण्यात आली. पाच वर्षापुर्वी मांडलेले शाळांचे प्रश्न आज आमचा कार्यकाळ संपत आला तरी सुटलेले नाहीत याची खंत व्यक्त करतांना सौ.नेरलकर म्हणाल्या. शाळा हा विषय महानगरपालिकेला नको आहे तर तो कायमचा बंद करा.एकूण चर्चेमध्ये स्वच्छ नांदेड सुंदर नांदेड या संकल्पनेला कसा काळीमा फासला गेला हीच चर्चा 4.30 वाजेपर्यंत सुरू होती. त्यानंतर विषय पत्रिकेबद्दल बोलणे सुरू झाले तेंव्हा पुन्हा गोंधळ सुरू झाला. कारण आपण मांडलेल्या समस्यांची उत्तरे नगरसेवकांना मिळालेली नव्हती. त्यानंतरही बराच वेळ दुसरेच विषय चालले. अखेरच्या क्षणात विषय पत्रिका पास-पास या शब्दात काही मिनिटातच मंजुर झाली.
नगरसेवक बापूराव गजभारे यांनी मी काही बोलणार नाही फक्त पत्र महापौरांना द्यायचे आहे असे सांगत सुरूवात केली तेंव्हा काय रस्ते काय ते खड्डे आणि काय ती टक्केवारी सर्वच कांही ओकेमध्ये आहे असे म्हणत सांगोल्याचे आमदार बापू यांच्याशब्दात सुरूवात केली तेंव्हा इतर सर्व नगरसेवक आरडा ओरड करू लागले. आणि बापूराव गजभारेंच्या शब्दांचा निषेध व्यक्त करत होते. हा घटनाक्रम पाहता एक तो बापू आणि एक हा बापू असे लिहिले तर चुक ठरणार नाही. आपल्या पत्रांचा स्विकार महापौरांनी केला नाही म्हणून आपल्या हातातील पत्रे नगरसेवक बापूराव गजभारे यांनी महापौरांकडे भिरकावून सभा त्याग केला. त्यानंतर नगरसेवक बापूराव गाजभारे यांना दोन सभांसाठी निलंबीत करण्याची घोषणा महापौर जयश्री पावडे यांनी जाहीर केले.
नगरसेवक दिकपसिंह रावत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विजयासाठी अभिनंदनाचा ठराव सादर केला. पण नगरसेवक आणि पदाधिकारी यांच्यामध्ये तो अभिनंदनाचा ठराव स्विकारण्यासाठी कोणतीही आवड दिसली नाही. त्यामुळे इतर नगरसेवकांनी त्या विषयाला बगल देत दुसरेच विषय बोलण्याची सुरूवात केली. त्यामुळे अभिनंदनाचा प्रस्ताव आपोआपच बारगळला गेला.
