

नांदेड(प्रतिनिधी)-वजिराबाद पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने एका अल्पवयीन बालकासह तीन जणांना अटक करून त्यांच्याकडून 75 हजार रुपये किंमतीच्या दोन दुचाकी गाड्या जप्त केल्या आहेत. न्यायालयाने याप्रकरणातील दोन जणांना पोलीस कोठडीत पाठविले आहे.
वजिराबाद पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार 4 जुलै रोजी गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय निलपत्रेवार, पोलीस अंमलदार गजानन किडे, शरदचंद्र चावरे, शेख इमरान, संतोष बेल्लूरोड आणि रमेश सुर्यवंशी हे आपल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत दररोजची गस्त करत असतांना हिंगोली गेट उड्डाणपुलाखाली गुलाब राजू प्रधान (21) आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक त्यांना भेटले. या दोघांकडे विचारणा केली असता. त्यांनी सहा महिन्यापुर्वी डॉक्टर्सलेनमधून एक दुचाकी चोरल्याचे सांगितले. त्याबाबत वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 457/2021 दाखल आहे. या आरेापींना अजून चौकशी केली असता त्यांनी मोहम्मद इब्राहिम मोहम्मद पाशु (24) याच्या भंगार दुकानावर दुसरी एक दुचाकी गाडी तिन हजार रुपयामध्ये विक्री केल्याचे सांगितले. या संदर्भाने वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 156/2022 दाखल आहे. चोरट्यांनी दुचाकीचे वेगवेगळे सुट्टे भाग करून तिची विक्री केली होती. या प्रकरणाचा तपास शरदचंद्र सोनटक्के यांच्याकडे देण्यात आला आहे. मुख्य न्यायदंडाधिकारी कीर्ती देसरडा उर्फ जैन यांनी या तिन चोरांपैकी दोघांना एक दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, विजय कबाडे यांनी वजिराबादचे पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार आणि गुन्हे शोध पथकाचे कौतुक केले आहे.