नांदेड(प्रतिनिधी)-गणेशनगर भागात मारोती मंदिराच्या शेजारी 52 पत्यांचा जुगार अड्डा अत्यंत जोरदारपणे आजही सुरू आहे. नांदेड जिल्हा पोलीसांनी बहुतेक जुगार अड्डे बंद पाडले आहेत. तरीपण या जुगार अड्ड्यावर कधीच नियंत्रण आलेले नाही.
नांदेड जिल्हा पोलीस दलाने जवळपास बहुतेक जुगार अड्ड्यांवर जरब आणली. अनेकांनी आपले जुगार अड्डे बंद झाले म्हणून वेगवेगळ्या नवीन धंद्यांकडे आपला कल वळवला. काही जणांनी नांदेड जिल्ह्याची हद्द सोडून लगतच्या जिल्ह्यांमध्ये जुगार अड्डे सुरू केले. तेथे जाण्या-येण्यासाठी वाहनांची सोय केली, जुगाऱ्यांना काय हवे ते उपलब्ध करून दिले. तरीपण बाहेर जिल्ह्यात जुगार अड्डे चालविणे तेवढे सहज नाही कारण त्या जिल्ह्यात सुध्दा जुगार चालक आहेत. आपल्या व्यवसायावर कोणी कुरघोडी केली तर ती दुसऱ्यांना आवडत नाही तेही तेवढेच खरे आहे.
नांदेड शहरात सुध्दा अनेक जुगार अड्ड्यांना बंद करण्यात आले. एक जुगार अड्डा काही लोकांनी लुटला होता. तरीपण रस्त्यावर एका माणसाची लुट झाली असा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याप्रकरणातील आरोपीने पोलीसांच्या मारहाणीची तक्रार केली होती. ती सुध्दा अद्याप न्यायाच्या प्रतिक्षेत आहे. अशा प्रकारे जुगार अड्डा हा एक असा विषय आहे. ज्याच्याकडे बऱ्याच लोकांचा कल असतो. त्यामुळे जुगार अड्डा कधीच बंद होत नाही हे काही जुगाऱ्यांचे सांगणे तेवढेच खरे वाटते.
नांदेड शहरातील गणेशनगर भागात मारोतीच्या शेजारी दररोजच गुलाम पडतो आणि हा गुलाम राजांपेक्षा जास्त तोऱ्यात वावरतो. काय कारण असेल याचे याचा शोध घेणे अत्यंत अवघड आहे. ज्या भागात हा जुगार अड्डा चालतो त्या भागात वास्तव्यास असलेली मंडळी सुध्दा उच्चभु्र आहेत. तरी पण या जुगार अड्ड्याबद्दल कोणी बोलत नाही. काय कारण असेल न बोलण्याचे याचा शोध कोणी घ्यावा.पण सुरू असलेल्या जुगार अड्ड्याच्या या कृतीमुळे पोलीस विभागाचे नियंत्रण अवैध धंद्यांवर संपले आहे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
