नांदेड(प्रतिनिधी)-भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण,पद्मश्री इत्यादी पुरस्काराने सन्मानित झालेल्या व्यक्तींच्या नावापुढे आता त्या पुरस्कारांचा उल्लेख करता येणार नाही असा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने निर्गमित केला आहे. या आदेशावर अवर सचिव क्रांती पाटील यांची डिजिटल स्वाक्षरी आहे.
केंद्र शासनाकडून विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या भारतीय नागरीकांना भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री आदि पुरस्काराने सन्मानीत केले जाते. ज्या व्यक्तींना हा पुरस्कार मिळालेला आहे. त्या व्यक्तीच्या नावाअगोदर किंवा नंतर या पुरस्कारांचा उल्लेख लिहिला जातो आणि सांगितला जातो. अनेक व्यक्तींची नावे लिहितांना त्यांचा मिळालेल्या पुरस्काराचा उल्लेख करून त्यांच्या नावाची सुरूवात केली जाते.
या संदर्भाने सर्वोच्च न्यायालयाने Transfer Cases (Civil) नंबर 9/1994 आणि नंबर 1 /1995 मध्ये अशा पध्दतीने मिळालेले पुरस्कार ते त्या व्यक्तीच्या नावाचे पुढे लावणे भारतीय संविधानाच्या आर्टीकल 18(ए) प्रमाणे चुकीचे आहे. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त व्यक्तींनी या प्रकरणातील क्रमांक 10 मध्ये दिलेल्या सुचनांचे पालन करणे आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशाला आधारीत धरुन राज्य शासनाने हा शासन निर्णय निर्गमित केला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा अपमान होणार नाही म्हणून पुरस्कार प्राप्त व्यक्ती, विविध शासकीय संस्था, अशासकीय संस्था, शासकीय विभाग, कार्यालय आदींनी कोणत्याही राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त व्यक्तीच्या नावाच्या आधी त्यांच्या पुरस्काराचा उल्लेख करू नये. राज्य शासनाने आपला हा शासन निर्णय संकेतांक क्रमांक 202206291148065107 नुसार राज्याच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केला आहे. याबाबतची माहिती राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना पाठवली आहे.
