नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या आई-वडीलांना काही एक न सांगता जालना येथून घरातून निघून आलेल्या एका 13 वर्षीय बालकाला ऑपरेशन मुस्कान-11 च्या पथकाने आपल्या ताब्यात घेवून त्याची विचारपुस करून त्याच्या वडीलांच्या सांगण्यावरून नांदेड जिल्ह्यातील त्याच्या एका मावस भावाकडे स्वाधीन केले.
नांदेड जिल्ह्यात पोलीस महासंचालकांच्या आदेशावरुन 1 जून ते 30 जून या दरम्यान ऑपरेश मुस्कान-11 ही शोध मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान पोलीसांनी संशयास्पद जागी सापडणाऱ्या बालकांचा शोध घेतला. त्यांना शोधून अनेक बालके या पथकाने त्यांच्या घरी पोहचून दिली. या मोहिमेदरम्यान पोलीस पथकाने केलेल्या कामगिरीने त्या बालकांच्या आई-वडीलांनी, त्यांच्या कुटूंबियांनी पोलीसांबद्दल व्यक्त केलेल्या भावना शब्दात लिहिण्याची ताकत आमचीही नाही. आपल्या बालकांना सांभाळतांना कोण-कोणत्या परिस्थितीतून जावे लागते. याबद्दल एक विचारवंत सांगतो की, “कुटूंब प्रमुखाची आवस्था घरावरील पत्रासारखी असते, उन,वारा, पाऊस, गारा सगळ सोसून तो निवारा देतो. पण बाकीच्यांच लक्ष फक्त तो आवाज खुप करतो आणि गरम पण खुप होतो यावरच असतं.’ ही भुमिका पालकांची असली तरी पोलीस पथकाने सुध्दा ऑपरेशन मुस्कान-11 राबवतांना अशा अनेक बालकांसाठी कुटूंबप्रमुखाची भुमिका वठवली.
अशाच एका मोहिमेत नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, विजय कबाडे, गृहपोलीस उपअधिक्षक डॉ.अश्र्वीनी जगताप, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनात काम करणाऱ्या पोलीस पथकाने एक 13 वर्षीय मुलगा रेल्वे स्थानकाच्या गेट क्रमांक 1 समोर शोधला. त्याची विचारपुस केली तेंव्हा मला शिक्षण घेण्यासाठी मामाच्या गावी राहायचे आहे आणि वडील मला आपल्याच जालना जिल्ह्यात राहुन शिक्षण घे असे सांगत होते आणि या नाराजीतून मी घरातून निघून आलो आहे. पोलीस पथकातील पोलीस उपनिरिक्षक प्रियंका आघाव, पोलीस अंमलदार अच्युत मोरे, मारोती माने, शितल सोळंके आणि राजकुमार कोटगिरे यांनी या बालकाबाबत सविस्तर माहिती प्राप्त करून त्याच्या वडीलांशी संपर्क साधला. त्याच्या वडीलांशी संपुर्ण सविस्तर चर्चा करून त्यांनी सांगितल्याप्रमाणे नांदेड जिल्ह्यात राहणाऱ्या त्या बालकाच्या मावस भावाकडे त्या मुलाचा ताबा दिला.
