नांदेड (प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासनाने सन 2013 मध्ये पोलीस उपनिरिक्षक पदाची परिक्षा उत्तीर्ण केलेल्या एकूण 244 पोलीस अंमलदारांना शासन निर्णयानुसार 25 टक्के कोट्यातून पदोन्नती देवून कार्यवाही करण्यात येईल असे विनंती पत्र अपर पोलीस महासंचालक संजीव कुमार सिंघल यांनी गृह विभागाचे अपर मुख्य सचिव ए.ए.कुलकर्णी यांच्याकडे पाठवला आहे. त्यामुळे पोलीस अंमलदारांच्या स्वप्नांना प्रत्यक्षात येण्यासाठी ही संधी आहे.
पोलीस विभागात पोलीस शिपाई या पदावर भरती झालेल्या लोकांना आपण कधी तरी अधिकारी होवू हे स्वप्न नेहमीच असते. यात शासनाने पोलीस उपनिरिक्षक पदामध्ये 50 टक्के लोकसेवा आयोगामार्फत, 25 टक्के विभागीय परिक्षांच्या माध्यमातून आणि 25 टक्के पदोन्नतीतून असे पोलीस उपनिरिक्षक भरती करण्यासाठी एक नियमावली तयार केली. त्यात पुढे पोलीस विभागातील पोलीस नाईक हे पद रद्द करण्यात आले. त्यानंतर पोलीस उपनिरिक्षक या पदापर्यंत पोहचण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या पोलीस अंमलदारांना ते स्वप्न प्राप्त झाले. पुढे शासन निर्णय नवीन आला आणि त्यात 50 टक्के सरळ सेवाभरती आणि 50 टक्के पदोन्नती या प्रक्रियेतून पोलीस उपनिरिक्षकांची पदे भरली जातील असे ठरले. यासाठी 31 डिसेंबर 2023 पर्यंत नवीन मागणी पत्र पाठविण्यात येईल तो पर्यंत पदोन्नती प्रक्रिया सुरू राहावी असे ठरलेले आहे. या प्रक्रियेत सन 2013 मध्ये उत्तीर्ण झालेल्या आणि अद्याप पदोन्नती प्राप्त न झालेल्या लोकांना ही पदे देता यावीत यासाठी 244 रिक्त पदे भरण्यासाठी हे पत्र गृहविभागाला पाठविण्यात आले आहे.
सन 2013 पोलीस उपनिरिक्षक पदाची परिक्षा पास झालेल्या बऱ्याच पोलीस अंमलदारांना पोलीस उपनिरिक्षक ही पदोन्नती प्राप्त झाली. तरी पण पोलीस उपनिरिक्षक भरती प्रक्रियेतील नवीन-नवीन बदलानुसार आजही 244 पद्दे रिक्त आहेत. त्या रिक्त पदांना भरण्याची परवानगी शासनाने दिल्याबरोबर ती पदे भरली जातील म्हणजे. 2013 मध्ये परिक्षा उत्तीर्ण केलेल्या सर्व पोलीस अंमलदारांचे स्वप्न पुर्ण होतील.
