नांदेड(प्रतिनिधी)-माहिती अधिकार कायद्याचा वापर करून खंडणी मागल्याप्रकरणी देगलूर पोलीस ठाण्यात आठवा गुन्हा दाखल झाला आहे.
नगर परिषद कार्यालय देगलूरमध्ये स्वच्छता निरिक्षक असलेले मारोती हाजप्पाराव गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 20 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 11.30 वाजता सुगतकुमार रमेशराव केरुरकर हा व्यक्ती कार्यालयात आला आणि म्हणाला तुम्ही देगलूर शहरात स्वच्छतेची कामे बरोबर करत नाहीत. स्वच्छतेचे काम करणाऱ्या संस्थेला पाठीशी घालत आहात त्यासाठी मी आजच माहिती अधिकाराखाली तुमच्याविरोधात माहिती मागवतो, तुमची वरिष्ठांकडे तक्रार करून तुमची नोकरी घालवतो असे सांगून मला धमकी दिली. त्यावेळी मारोती गायकवाडने सुगतकुमार केरुरकरला सांगिेतली माझी नोकरी थोडेच दिवस शिल्लक आहे. तुमची काही तक्रार असेल तर सांगा मी त्यावर लक्ष देतो. माझी उगीच तक्रार करू नका. त्यावेळी सुगतकुमार केरुरकरने मला सांगितले की, मला दहा हजार रुपये द्या तर तुमची माहिती मागणार नाही आणि तक्रार करणार नाही. त्यावेळी मी पुन्हा सुगतकुमारला सांगितले की, माझी सेवानिवृत्ती जवळ आली आहे मला त्रास देवू नका. त्यानंतर 21 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 2.30 वाजता जुनी नगर परिषद देगलूरच्या गेटजवळ मी आणि माझा एक मित्र आणि सुगतकुमार केरुरकर समोरासमोर भेटलो तेंव्हा पुन्हा दहा हजार रुपये खंडणीची मागणी केली. पण मी गप्प राहिलो आणि पोलीसांनी वर्तमान पत्रातून जनतेला आवाहन केल्यानंतर माझी तक्रार देण्याची हिंम्मत झाली म्हणून आज तक्रार देत आहे. या तक्रारीवरुन सुगतकुमार रमेशराव केरुरकर विरुध्द खंडणी मागल्याच्या कारणासाठी गुन्हा क्रमांक 310/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 384, 506 नुसार दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरिक्षक संगमनाथ परगेवार यांच्याकडे देण्यात आला आहे. देगलूर पोलीस ठाण्यात दाखल झालेला खंडणीचा हा आठवा गुन्हा आहे.
एका गुन्हा धर्माबादकडे वर्ग
तीन दिवसापुर्वी महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीचे तंत्रज्ञ दिलीप गंगाधर वडगावे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन देगलूर पोलीस ठाण्यात सुगतकुमार रमेशराव केरुरकर आणि आकाश विठ्ठलराव देशमुख या दोघांविरुध्द दहा हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा देगलूर पोलीस ठाण्यात दाखल झाला. त्या तक्रारीनुसार खंडणी मागणीचा प्रकार रत्नाळी रेल्वे गेटजवळ चहा पितांना घडला होता. त्यामुळे रत्नाळी गेटची हद्द धर्माबाद पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असल्याने हा एक गुन्हा धर्माबाद पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. धर्माबाद येथे या गुन्ह्याचा क्रमांक आता 161/2022 असा झाला आहे. धर्माबाद येथील सहाय्यक पोलीस निरिक्षक कत्ते यांच्याकडे या गुन्ह्याचा पुढील तपास देण्यात आला आहे.
