नांदेड(प्रतिनिधी)-पोलीसांनी वर्तमानपत्रात जनतेला आवाहन केल्यानंतर देगलूर पोलीस ठाण्यात माहिती अधिकारान्वये माहिती मागून खंडणी मागणाऱ्यांविरुध्द पुन्हा दोन नवीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
23 जून रोजी नगर परिषद कार्यालय देगलूर येथे काम करणारे अभियंता बळीराम व्यंकटराव बेलकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 4 फेबु्रवारी 2020 रोजी आकाश विठ्ठल देशमुख हा व्यक्ती माझ्या कार्यालयात आला आणि पाणी पुरवठा विभागात अत्यंत निकृष्ठ कामे होत आहेत. मी याबाबत माहिती अधिकाराखाली माहिती मागून त्याबद्दलची तक्रार मंत्रालयापर्यंत करील असे म्हणाला. माझे काम निकृष्ठ दर्जाचे नाही असे मी म्हणालो. तेंव्हा आकाश विठ्ठलराव देशमुख हा म्हणाला तुम्ही मला 7 हजार रुपये द्या मी तुमची कोणतीच माहिती मागणार नाही. आपली नोकरी सुरळीत चालावी म्हणून मी त्या दिवशी दुपारी आकाश देशमुखला 7 हजार ुपये दिले. तो माहिती अधिकार कार्यकर्त्या आणि मनसे कार्यकर्ता असल्याने माझ्या नोकरीत त्रास येवू नये म्हणून मी कोणाकडे याबाबत तक्रार केली नाही. पण पोलीसांनी वर्तमानपत्रातून आवाहन केले होते की, माहिती अधिकाराचा अर्ज देवून त्यात खंडणी मागणाऱ्यांविरुध्द तक्रारी द्या म्हणून मी तक्रार करीत आहे. देगलूर पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 305/2022 दाखल केला आहे.
दुसऱ्या एका तक्रारीत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे तंत्रज्ञ दिलीप गंगाधर वडगावे दिलेल्या तक्रारीनुसार दि.9 नोंव्हेंबर 2020 रोजी सुगतकुमार रमेशराव करुरकर हे त्या कार्यालयात आले आणि माहिती अधिकारान्वये तंत्रज्ञ दिलीप गंगाधर वडगावे यांची माहिती मागितली. दि.1 जून 2021 रोजी मी धर्माबाद येथे ड्युटीवर असतांना रेल्वे गेट रत्नाळी येथे चहा पिण्यासाठी गेलो असता मला कॉल आला आणि सुगतकुमार केरुरकर याचा मित्र आकाश विठ्ठलराव देशमुख बोलतो, मी व सुगतकुमार धर्माबादला आलो आहोत असे सांगितले. आम्ही तुझ्या विरुध्द माहिती अधिकारामध्ये माहिती मागितली आहे. तुला त्याबद्दल त्रास नको असेल तर आम्हाला 10 हजार रुपये दे यात तडजोड झाली आणि मी त्यांना 5 हजार रुपये दिले. पोलीसांनी वर्तमानपत्रातून जनतेला आवाहन केल्यानंतर मी तक्रार दिली आहे. यावरुन देगलूर पोलीसांनी गुन्हा क्रमांक 304/2022 सुगत केरुरकर आणि आकश देशमुखविरुध्द दाखल केला आहे. पोलीसांनी माहिती अधिकार आणि त्यानंतर खंडणी असा कांही प्रकार घडला असेल तर त्याबाबत तक्रारी द्या असे आवाहन केल्यानंतर देगलूर पोलीस ठाण्यात जवळपास 8 ते 10 गुन्हे दाखल झाले आहेत. वास्तव न्युज लाईव्ह सुध्दा प्रत्येक वाचकाला विनंती करत आहे की, असे काही घडत असेल तर त्याबद्दल संबंधीत पोलीस ठाण्यात तक्रार द्या.
