नांदेड(प्रतिनिधी)-अनुसूचित जातीचे लोक मराठ्यांच्या घरी वसुलीसाठी येतात काय असे सांगून एका ऍटो फायनान्स कंपनीच्या कमिशन एजंटला ग्राम पंचायत कार्यालयात कोंडून ठेवणाऱ्या चार जणांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी तीन वर्ष सक्त मजुरी आणि प्रत्येकास 23 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
योगीराज नारायण कावळे हे अनुसुचित जातीचे व्यक्ती आहेत. वर्धा येथील एका ऍटो फायनान्सचे ते कमिशन एजंट आहेत. या फायनान्समधील एक व्यक्ती मारोती अंकुशकर रा.घोटी ता.किनवट जि.नांदेड यांच्याकडे ते दि.17 जून 2017 रोजी पैसे वसुलीसाठी गेले होते. त्यावेळी त्याच गावातील बालाजी प्रल्हादराव पावडे (34), कैलास देवराव पावडे (39), राजेंद्र भाऊराव पावडे (26), गजानन दत्ता बोंढारकर (30) हे चौघे आले आणि मराठ्यांच्या घरी अनुसूचित जातीचे व्यक्ती पैसे वसुलीसाठी येतात काय असे बोलून जातीविषयक उल्लेख करून अनेक शिवागाळ केल्या. सोबतच त्यांना मारत घोटी ग्राम पंचायत कार्यालयात नेले आणि तेथे कोंढून टाकले. नंतर कशी-बशी सुटका झाली आणि त्यांनी याप्रकरणाची तक्रार 18 जून 2017 रोजी किनवट पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून पोलीसांनी गुन्हा क्रमांक 157/2017 भारतीय दंड संहितेच्या कलम 323, 506 आणि 342 सह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील कलम 3(1) (10)(आर) प्रमाणे गुन्हा दाखल केला. तत्कालीन पोलीस उपअधिक्षक दत्तात्रय वाळके यांनी या प्रकरणाचा संपुर्ण तपास करतांना बालाजी पावडे, कैलास पावडे, राजेंद्र पावडे आणि गजानन बोंढारकर यांना अटक करुन त्यांच्या विरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.
न्यायालयात या ऍट्रॉसिटी विशेष सत्र खटल्याचा क्रमांक 19/2018 असा आहे. या खटल्यादरम्यान 9 साक्षीदारांनी आपले जबाब न्यायालयासमक्ष नोंदवले. त्यात उपलब्ध झालेल्या पुराव्या आधारावर न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 323, 506 आणि 342 या कलमांसाठी एक वर्ष सक्तमजुरी आणि प्रत्येक कलमासाठी प्रत्येक आरोपीला एक-एक हजार रुपये रोख दंड तसेच ऍट्रॉसिटी कायद्यातील कलमांसाठी 3 वर्ष सक्तमजुरी आणि प्रत्येक आरोपीला 20 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली. आरोपींसाठी दंडाची एकूण रक्कम प्रत्येकी 23 हजार रुपये झाली आहे. झालेल्या सर्व शिक्षा त्यांना एकत्रित भोगायच्या आहेत.
या खटल्यात अतिरिक्त सरकारी अभियोक्त ऍड. बी.एम.हाके यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. तर आरोपींच्यावतीने ऍड. प्रविण आयचित यांनी काम पाहिले. या खटल्यात किनवटचे पोलीस निरिक्षक अभिमन्यु साळुंके यंाच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार भगवान महाजन आणि एस.एस.ढेंबरे यांनी पैरवी अधिकाऱ्याची भुमिका वठवली.
