ताज्या बातम्या लेख

24 तासापासून सुरू असलेल्या राजकीय भुकंपामध्ये प्रत्येक राजकीय पक्ष आपली तुंबडी भरण्यात मग्न

नांदेड(प्रतिनिधी)-राज्यात चाललेल्या राजकीय भुकंपाने कालपासून राज्यात वेगवेगळ्या चर्चा, वेगवेगळ्या घडामोडी समोर येत आहेत. या सर्वांमध्ये प्रश्न असा आहे की, तुम्ही स्वत:साठी स्विकारलेली विचारसरणी कोठे गेली? आपली विचारसरणी वगळून सरकारमध्ये कायम राहण्याची ही होड ही खरीच जनतेच्या मनात आहे काय? आणि नसेल तर जनतेच्या प्रतिनिधींना असे करण्याचा अधिकार असतो काय? हा एक नवीन प्रश्न राजकीय भुकंपातून समोर आला. कोणताही पक्ष यात आमच्या दृष्टीने वेगळा नाही. प्रत्येक राजकीय पक्षाने आपल्या विचारसरणींना वगळून नवीन विचारसरणींमध्ये तु मोठा नाही मी मोठा अशीच वागणूक ठेवल्यामुळे आज सुरू असलेला राजकीय भुकंप घडला आहे.
2019 ची विधानसभा निवडणुक झाली तेंव्हा कोणत्याही पक्षाकडे बहुमत नव्हते. जे दोन पक्ष भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना पुर्वी एकत्र होते त्यांच्यात सुध्दा मिठाचा खडा पडलेला होता. या राजकीय परिस्थितीमध्ये आजप्रमाणेच त्यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे अजित पवार भाजपसोबत मिळाले. त्याच्या परिणामात पहाटे 6 वाजता शपथविधी झाला. ज्या भारतीय जनता पक्षाला शिस्तीचा पक्ष म्हणून ओळखले जाते. त्यांनी पहाटे 5 वाजता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोन पदांचा शपथविधी राज्यपालांसमक्ष घेतला. भारतीय जनता पार्टीने यापुर्वी असे कधीच केलेले नव्हते. मी पुन्हा येणार या देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दांना खिल्लीत उडवले गेले. देवेंद्र फडणवीस निवडूण आले त्या मतांची फरक संख्या पाहिली तर त्याला विजय म्हणावे काय? आणि तोही मुख्यमंत्र्यांचा विजय असे वाटत होते. असो राजकीय विजय हा राजकीय विजय असतो. त्यात नांदेडच्या हदगाव विधानसभेतून एका मताने निवडूण गेलेल्या बापूराव पाटील आष्टीकर यांची बातमी बीबीसी लंदनने दिली होती. ते विधानसभेत आपला परिचय द्यायला उभे राहिले तेंव्हा अध्यक्षांनी सांगितले होते की, आपल्याला तर आता संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो आहे तरी पण आपले नाव सांगा. त्यामुळे विजय एक मताच्या फरकाचा आहे की, लाखो मतांच्या फरकांचा आहे याला काही एक महत्व नसते.
भाजप राष्ट्रवादीने घेतलेला शपथविधी 2019 मध्ये कांही तासच टिकला आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी एकत्रितपणे एक नवीन विचार पुढे आणण्याचा प्रयत्न केला. ज्यामध्ये राष्ट्रवादी, कॉंगे्रस आणि शिवसेना या तिन राजकीय पक्षांचा समावेश आहे. त्यावेळी मुख्यमंत्री पदाची माळ शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्या गळ्यात टाकण्यात आली आणि ते सरकार आजपर्यंत चालत आहे. यामध्ये स्वत: मुख्यमंत्री असतांना आपल्या मुलाला मंत्री करणे ही चुकच झाली होती असेच म्हणावे लागेल. कांही तासांपुर्वी या राजकीय भुकंपाच्या सुरूवातीला उध्दव ठाकरे यांनी त्या राजकीय भुकंपाचे उत्तर देण्याची जबाबदारी आदित्य ठाकरेला दिली. हे सुध्दा चुकलेलेच आहे. एकनाथ शिंदे सारखे वरिष्ठ नेते आदित्य ठाकरेंचे संबोधन ऐकतील काय असा नवीन प्रश्न या निमित्ताने समोर आला. त्यानंतर विधान परिषदेची निवडणूक झाली आणि त्यामध्ये भारतीय जनता पार्टीने 134 मते प्राप्त केली आणि कालपासून सुरू झालेला भुकंपाचा रिक्टरस्केल वाढतच गेला. आजच्या परिस्थितीत एकनाथ शिंदे सोबत 34 आमदार आहेत. त्यामध्ये नांदेडचे आमदार सुध्दा आहेत. म्हणजे आपल्या पक्षाशी या सर्वांनी आपली श्रध्दा फिरवलीच.
आज दुपारी एकनाथ शिंदे यांना गट नेते पदावरून कमी केल्याची घोषणा शिवसेनेने केली आणि त्यानंतर लगेच एकनाथ शिंदे भाजपसोबत जाणार असे वृत्त राष्ट्रीय वृत्त वाहिन्यांनी सुरू केले.एक दुसऱ्याशी नाते जुडतांना बरोबरी केली की मग अनेक अडचणी येतात. कोणताही माणूस स्वत: मोठा होत नाही. त्यासाठी स्वत:ची किंमत वाढवावी लागते आणि आपल्याला ज्वालेचा त्रास सहन करावा लागतो. आपल मन इतरत्र गुंतवल तर नुकसान आपलच होत. हे कोणाला आज कळत नाही आहे. राजकीय भुकंपामध्ये मला काय मिळणार आहे याचीच चिंता सर्वांना आहे आणि त्यातून नुसती ओढा-ओढी सुरू आहे. वडिलांना समजण हे एक मोठ अवघड गणित असत. आई तर बिचारी सरळ हिंदीसारखी असते असे एक विचारवंत म्हणतात. मला या राजकीय भुकंपामध्ये कोठेही एकही पिता दिसत नाही. ज्याच्या नियंत्रणात मुले वागतात किंबहुना वागायला हवी आणि असा वडील नसेल तर ते वडील नावाचे गणित कसे सोडवता येईल. थंड पाणी आणि गरम स्त्री कपड्यांना पडलेल्या सुरकुत्या सरळ करतात याचप्रमाणे थंड डोक आणि उर्जेने भरलेले हृदय जीवनातील सर्व समस्या सरळ करतात. विश्र्वास त्यावर करायला हवा.
प्रत्येक राजकीय पक्षाने आपल्या मुळ विचारण सरणीला फाटा देवून एक नवीन त्रिकुट तयार केले आणि त्या त्रिकुटाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे शासन चालविण्याचा प्रयत्न केला. यामध्ये सर्वात मोठी गोची सर्वसामान्य राजकीय कार्यकर्त्याची झाली. त्यांचा विचार कधी कोणी केलाच नाही. मोठ-मोठ्या महापुरूषांची नावे घेवून आम्ही त्यांचे अनुयायी आहोत असे म्हणण्यात आज काही अर्थ नाही. त्या महापुरूषांनी आपले विचार मांडले तेंव्हा त्यांना झालेला त्रास आजच्या कोणत्याही राजकीय नेत्याने अनुभवलेला नाही. कांही जणांना तर महापुरूषांनी काल पायी फिरत होते आणि आज मंत्री झाले अशा परिस्थितीत आणले. पण आज आपल्या स्वत:च्या स्वार्थासाठी सर्व सामान्य मतदाराने ज्या त्यांच्या विचारसरणीला वळवले. ती वळवलेली विचारसरणी त्यांच्या मतदारांना आवडते काय? याचा विचार तर कोणीच केलेला नाही. आपण वेगवेगळ्या चाचण्या करून आपली प्रकृती तपासतो. शरिरात विटामीण कमी झाल्याची नोंद घेतली जाते. कधी आपल्या व्यक्तीमत्वाची सुध्दा तपासणी करावी त्यामुळे तुमच्यातील मानवता कमी होत आहे काय याचा अहवाल प्राप्त होईल. पण यावर कोणाला विचार करायचाच नाही.
आज एकनाथ शिंदे भारतीय जनता पार्टीसोबत गेले तर त्यांचा मुळ शिवसैनिक भारतीय जनता पार्टीला मतदान करणार आहे काय? याचे उत्तर तर पुढच्या निवडणुकीत दोन वर्षानंतर समोर येईल. याचा अर्थ उपलब्ध असलेल्या वेळेमध्ये प्रत्येक राजकीय पक्षाने आपल्या तुंबड्या भरण्यासाठीच आजचा राजकीय भुकंप तयार केला आहे असे म्हणटले तर चुक ठरणार नाही. संत तुकारामाच्या गाथा अनेकांनी बुडवल्या पण त्या तरुनच आल्या. अशाच प्रकारे चांगल्या व्यक्तीमत्वाला कितीही लोकांनी बुडवायचा प्रयत्न केला तर ते कधीच बुडणार नसते याचे भान आजचा राजकीय भुकंप आणणाऱ्यांनी ठेवायला हवा.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *