नांदेड(प्रतिनिधी)-लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सज्जा मार्तंड ता.जि.नांदेड येथील तलाठी आणि सज्जा विष्णूपूरी येथील कोतवालने आज ७ हजार रुपये लाच स्विकारली म्हणून कोतावालास गजाआड केले आहे.
लाच लुचपत प्रतिबंधक विभगााने जारी केलेल्या माहितीनुसार १६ जून २०२२ रोजी एका ७३ वर्षीय तक्रारदाराने तक्रार दिली की, जमीनीची वाटणीपत्राआधारे फेरफारला नोंद घेवून नवीन सातबारा देण्यासाठी मार्तंड सज्जाचे तलाठी संभाजी रघुनाथ घुगे हे २५ हजार रुपयांची लाच मागणी करत आहेत. त्यातील १५ हजार रुपये पुर्वीच स्विकारलेले आहेत आणि उर्वरीत दहा हजार रुपये विष्णूपूरी तलाठी सज्जा येथील कोतवाल बालाजी ग्यानाबाराव सोनटक्के यांच्या तडजोडीनंतर दहा हजार ऐवजी सात हजार रुपये आज दि.२० जून रोजी स्विकारले. लाच मागणीच्या पडताळणीत दहा हजारांची मागणी होती. तक्रारीपुर्वी १५ हजार स्विकारले आणि एकूण लाचेची मागणी २५ हजार रुपये होती. आज स्विकारलेले लाचेचे ७ हजार रुपये लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहेत. यातील कोतवाल बालाजी ग्यानबाराव सोनटक्के (३९) यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतलेले आहे. तलाठी संभाजी रघुनाथ घुगे याबद्दल काही एक माहिती प्रेसनोटमध्ये देण्यात आलेली नाही.गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक डॉ.राजकुमार शिंदे, अपर पोलीस अधिक्षक धरमसिंग चव्हाण, पर्यवेक्षण अधिकारी पोलीस उपअधिक्षक राजेंद्र पाटील, सापळा अधिकारी पोलीस निरिक्षक अश्विनीकुमार महाजन यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक निरिक्षक राहुल पकाले, पोलीस अंमलदार किशन चिंतोरे, सचिन गायकवाड, जगन्नाथ अनतवार, शिवशंकर भारती, निलकंठ येमुलवाड, मारोती सोनटक्के आणि गजानन राऊत यांनी ही कार्यवाही पुर्ण केली.
ही माहिती प्रसार माध्यमांकडे देतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन केले आहे की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा. कार्यालय दुरध्वनी – 02262 253512,राजेंद्र पाटील, पोलिस उप अधीक्षक, ला.प्र.वि. नांदेड मोबाईल नंबर – 7350197197 ,टोल फ्रि क्रमांक 1064 वर माहिती द्यावी.