

नांदेड(प्रतिनिधी)-छोट्याशा भुखंडाच्या वादातून अनेक वाटेकऱ्यांमध्ये असलेला वाद एका खूनासोबत आज अर्धविरामावर पोहचला. ही घटना गाडीपुरा भागातील एकखंबा दर्गाह जवळ घडली.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास एक 33 वर्षीय व्यक्ती रक्ताने माखलेला खंजीर हातात घेवून पोलीस ठाणे इतवारा येथे दाखल झाला. वेळ अशी होती की, पोलीसांची पाचावर धारण बसली. त्याच्याकडे विचारणा केली असता खंजीरधारी व्यक्तीने सांगितले. मी चुलत भावाचा खून केला आहे. माहिती कळताच पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर भोरे, पोलीस निरिक्षक भगवान धबडगे, सहाय्यक पोलीस निरिक्षक आर.एस.मुत्येपोड, पोलीस उपनिरिक्षक शेख असद आणि असंख्य पोलीस अंमलदार त्वरीत एकखंबा दर्गाह जवळ पोहचले. तेथे लोकांनी सांगितले की, मयताचे नाव शामसिंह प्रकाशसिंह परमार (50) असे आहे. मारणारा जो पोलीस ठाण्यात पोहचला होता. तो मनोज राजेंद्रसिंह परमार (33) हा आहे. घटनास्थळावरून प्राप्त झालेल्या माहितीनुसार एकखंबा दर्गाहजवळ (ज्या ठिकाणी विक्की ठाकूरचा खून झाला होता त्या ठिकाणापासून जवळ) असलेल्या एका भुखंडाबाबत पाच वाटेकऱ्यांमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. त्यात मनोजसिंह परमार आणि त्याचे चुलत बंधून प्रकाशसिंह परमार हे सुध्दा दोन वाटेकरी होते. भुखंडाच्या वाटणीचा वाद आज मनोजसिंह परमारने आपला चुलत भाऊ शामसिंह परमार याच्या खून करून अर्धविरामापर्यंत पोहचविला. याबाबतची कायदेशीर प्रक्रिया वृत्तलिहिपर्यंत पुर्ण झाली नव्हती. असंख्य पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार घटनास्थळी कार्यरत आहेत. एका मारेकऱ्याने खून करून रक्ताने माकलेला खंजीर हातात घेवून पोलीस ठाणे गाठल्याचा हा प्रकार मागील 20 वर्षात दुसऱ्यांदा घडला आहे.