

सिकंदराबाद-साईनगर, अजिंठा एक्सप्रेस रद्द
नांदेड (प्रतिनिधी)-लष्करी सेवेसाठी केंद्र सरकारने लागू केलेल्या अग्नीपथ योजनेला अनेक राज्यामधून तीव्र विरोध होत असून तरूणांनी हिंसक आंदोलन सुरू केले आहे. हिंसाचाराचे लोण आता मराठवाड्यालगत असलेल्या सिकंदाबादमध्ये ही पोहचले आहे. आक्रमक तरूणांनी रेल्वे स्थानकावर उभी असलेली रेल्वे जाळून आपला रोप व्यक्त केला. दरम्यान या आंदोलनामुळे दक्षिण मध्य विभागातून धावणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत.
केंद्र सरकारने लष्कर भरतीसाठी अग्नीपथ योजना जाहिर केली. या योजनेनुसार लष्करामध्ये चार वर्षासाठी भरती केली जाणार असून त्यातील 25 टक्के जवांनाना 15 वर्षांसाठी सेवेत सामावून घेतले जाणार आहे. मात्र उर्वरीत 75 टक्के जवानांना बेकारीची संकट येणार आहे, त्यामुळे देशात या योजनेला तीव्र पडसाद उमटत आहेत. केंद्राच्या या निर्णयाविरोधात हजारो तरुण रस्त्यावर उतरले आहेत. अग्रीपथ योजनेच्या निषेधार्थ अनेक ठिकाणी तरूण हिंसक आंदोलन करित आहेत. देशातील बिहार, युपी, हरीयाणा, हिमाचल प्रदेश, राजस्थान येथील आंदोलनाचे लोण आता मराठवाडयालगत असलेल्या सिकंदराबाद येथेही पोहचले आहे. संतप्त झालेल्या शेकडो तरूणांनी शुक्रवारी दुपारी सिकंदराबाद रेल्वेस्थानकावर उभी असलेल्या रेल्वेला आग लावली. काही वेळात आगीचा भडका उडाला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलीसांनी आंदोलकांना पांगविण्यासाठी लाठी चार्ज केला. तरीही तरुणांनी रेल्वे स्थानक परिसरात टायर जाळून तीव्र निषेध नोंदविला. दरम्यान या आंदोलनामुळे दक्षिण मध्य विभागातून धावणाऱ्या अनेक रेल्वे गाड्यात बदल केला आहे. यात सिकंदराबाद तिरूअंनतपुरम ही रेल्वे रद्द करण्यात आली. तर अंशतः रद्द करण्यात आलेल्या रेल्वेत विजयवाड़ा सिकंदराबाद, सिकंदराबाद विजयवाडा, सिकंदराबाद – तिरूपती, – सिकंदराबाद – गुंटूर, सिकंदराबाद- सिरपुर, गुंटूर सिकंदराबाद, कर्नुल हैदराबाद या गाडयांचा समावेश आहे. गुंटूर विकाराबाद ही रेल्वे अन्य – मार्गाने वळविण्यात आली आहे. तर सिकंदराबाद -मुंबई देवगिरी एक्सप्रेस ही निर्धारित वेळेऐवजी सायंकाळी सात वाजता उशीराने सोेडण्यात आली. तर सिकंदराबाद-श्री. साईनगर शिर्डी, सिकंदराबाद-मनमाड (अजिंठा एक्सप्रेस) या गाड्या रद्द करण्यात आल्या. गेल्या दोन दिवसापासून या योजनेच्या विरोधात अनेक भागामध्ये जाळपोळ, हिंसाचार सुरु झाला आहे. यामुळे रेल्वे सेवेवर मोठा परिणाम झाला आहे.