नांदेड(प्रतिनिधी)-संजय बियाणी हत्याकांडात आज दोन जणांची पोलीस कोठडी संपल्यानंतर सहाय्यक पोलीस अधिक्षक अर्चित चांडक यांच्या पथकाने त्यांना मकोका न्यायालयात हजर केले. दिल्लीच्या तिहाड तुरूंगातून आणलेले दोघे आणि तिसरा नांदेड येथील युवक अशा तिघांना मकोका विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी पाच दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. या प्रकरणात 9 जण अगोदरच मकोका न्यायालयाने 20 जून पर्यंत पोलीस कोठडीत पाठविलेले आहेत.
संजय बियाणी हत्याकांडात 13 जून रोजी मकोका कायद्याची वाढ झाली. त्या दिवशी 9 जणांना मकोका न्यायालयाने 20 जून पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले होते. मकोका जोडण्याअगोदर दिल्लीच्या तिहाड तुरूंगातून आणलेले राजपालसिंघ ईश्र्वरसिंघ चंद्रावत (29), योगेश कैलासचंद भाटी रा.उज्जैन (मध्यप्रदेश) आणलेल्या दोघांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने 15 जून पर्यंत पोलीस कोठडी दिलेली होती.
आज या दोघांची पोलीस कोठडी संपल्यानंतर या दोघांसह तिसरा रणजित सुभाष मांजरमकर (२५) रा.पौर्णिमानगर नांदेड अशा तिघांना सहाय्यक पोलीस अधिक्षक अर्चित चांडक, सहाय्यक पोलीस निरिक्षक चंद्रकांत पवार, पोलीस उपनिरिक्षक गणेश गोटके, अनेक पोलीस अंमलदार आणि क्युआरटीचे जवान यांनी न्यायालयात हजर केले. सहाय्यक सरकारी अभियोक्ता ऍड. राजूरकर आणि अर्चित चांडक यांनी या तिघांना का पोलीस कोठडी आवश्यक आहे याबद्दल सविस्तर सादरीकरण न्यायालया समक्ष केले.त्यात आरोपींनी विकर मी आणि सिगनल अप्सचा उपयोग करून आपसात संपर्क ठेवला होता. त्याची माहिती मिळवणे आहे. राजपालसिंघ ईश्र्वरसिंघ चंद्रावत (29), योगेश कैलासचंद भाटी रा.उज्जैन (मध्यप्रदेश) या दोघांना 5 दिवस आणि रणजित सुभाष मांजरमकर (२५) रा.पौर्णिमानगर नांदेड यास 10 दिवस पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी केली होती. युक्तीवाद ऐकून न्या.एस.ई.बांगर यांनी तिघांना 5 दिवस अर्थात 20 जून 2022 पर्यंत पोलीस कोठडी पाठविले आहे. बियाणी हत्याकांडात आता मकोका न्यायालयात एकूण आरोपी संख्या 12 झाली आहे.