नांदेड(प्रतिनिधी)-शेतीवर घेतलेले कर्ज आणि त्याला फेडण्याची सुविधा यावर पती-पत्नीमध्ये झालेल्या वादातून पतीने पत्नीला पेटवून दिले आणि ती मरण पावली. 7 वर्षाच्या बालकाने न्यायालयासमोर आपल्या आईचा मृत्यू दुसऱ्यांदा जबाबानुसार उभा केला. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी या नवऱ्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
नांदेडच्या दरवेशनगर भागात यशोदा आणि संदीप हे पती पत्नी आपल्या एक मुलगा आणि एक मुलगी असे एकत्र राहत होते. दि.22 नोव्हेंबर 2017 रोजी सकाळी 9 वाजेच्यासुमारास पत्नी यशोदाने पती संदीपला शेतीवर घेतलेले 50 हजारांचे कर्ज या विषयी विचारणा केली. या प्रसंगी मुलगी शाळेत गेली होती आणि लहान 7 वर्षाचा मुलगा घरी होता. विचारणेचा वाद सुरू झाला. तेंव्हा वडील संदीपने आपल्या मुलाला 5 रुपये दिले आणि चिप्सचा पुडा आणायला सांगितले. मुलगा पण बाहेर गेला. या दरम्यान संदीपने आपली पत्नी यशोदाला भरपूर मारहाण केली आणि या मारहाणीत ती खाली पडल्यावर तिच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जिवंत जाळून टाकले. यशोदाने आरडा ओरड केल्यानंतर घरमालक आणि आसपासच्या लोकांनी तिला शासकीय रुग्णालयात नेले. दरम्यान बाहेर गेलेला मुलगा परत आला आणि आपली आई जळत आहे पाहुन तोही ओरडला. त्याने आईला वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यात त्याच्याही हाताला भाजल्याच्या जखमा झाल्या.
रुग्णालयात उपचार घेतांना यशोदाने दिलेल्या तक्रारीनुसार तिचा नवरा संदीप माणिकराव सुर्यवंशी (35) रा.पांगरा (तळ्याचा) ता.कंधार जि.नांदेड ह.मु.दरवेशनगर नांदेड याच्याविरुध्द गुन्हा क्रमांक 344/2017 भारतीय दंड संहितेच्या कलम 307 नुसार दाखल केला. दरम्यान उपचार सुरू असतांना 22 नोव्हेंबर 2017 रोजी 70 टक्के जळालेल्या यशोदाचा मृत्यू झाला. त्यानंतर या गुन्ह्यात भारतीय दंड संहितेचे कलम 302 वाढविण्यात आले. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक शेख जावेद यांनी केला होता. त्यांनी पत्नीचा मारेकरी संदीप माणिकराव सुर्यवंशी यास अटक करून तपास पुर्ण केला आणि न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
न्यायालयात हा सत्र खटला क्रमांक 57/2018 सुरू झाला. यात एकूण 12 साक्षीदारांनी आपले जबाब नोंदवले. त्यात मयत यशोदाचा 7 वर्षाचा मुलगा सचिन यांनी आपला जबाब न्यायालयासमक्ष नोंदवला तेंव्हा त्याने पुन्हा एकदा दि.22 नोव्हेंबर 2017 रोजी सकाळी घडलेला प्रसंग न्यायालयासमक्ष मांडला. त्यात त्याने सविस्तरपणे काय घडले होते. हे न्यायालयास सांगितले. घटनेच्यावेळी मारेकरी संदीप सूर्यवंशीने परिधान केलेला शर्ट ओळखला. या प्रकरणाचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्या.श्रीकांत आणेकर यांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 302 प्रमाणे जन्मठेप, 323 प्रमाणे 1 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली. या दोन्ही शिक्षा त्याला सोबत भोगायच्या आहेत. या खटल्यात सरकार पक्षाची बाजू जिल्हा सरकारी अभियोक्ता ऍड. आशिष गोदमगावकर यांनी मांडली. या खटल्यात विमानतळ येथील सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक मोहन राठोड, त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार रामदास सूर्यवंशी यांनी पैरवी अधिकाऱ्याची भुमिका पार पाडली.
