नांदेड(प्रतिनिधी)-संजय बियाणी हत्याकांडानंतर नांदेड पोलीसांनी 11 जणांना अटक केली आहे. त्यातील 9 जणांची पोलीस कोठडी आज संपली आणि इतर पाच जणांची पोलीस कोठडी 15 जूनपर्यंत आहे. आज पोलीसांनी या प्रकरणात मकोका कायदा जोडल्याचे निवेदन प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात सादर केले. मकोका न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी या 9 जणांना सात दिवस अर्थात 20 जून 2022 पर्यंत मकोका पोलीस कोठडीत पाठविले आहे. मकोकाचा तपास आयपीएस अधिकारी अर्चित चांडक यांच्याकडे देण्यात आला आहे.
5 एप्रिल रोजी प्रसिध्द बांधकाम व्यवसायीक संजय बालाप्रसाद बियाणी यांची त्यांच्या घरासमोरच गोळ्या झाडून हत्या झाली. पण मारेकरी सापडले नाहीत. घडलेले खून प्रकरण राज्यभर गाजले. देशभर त्याविरुध्द आवाज उठविला गेला. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबेळी यांच्या मार्गदर्शनात विशेष तपपास पथक (एसआयटीची) स्थापना झाली. या एसआयटीमध्ये कांही पोलीस अधिकारी आणि कांही पोलीस अंमलदार यांची नावे या एसआयटीचे सदस्य म्हणून होती. पण या प्रकरणात जवळपास 200 पोलीस अधिकारी आणि अंमलदार कार्यरत होते. 31 मे रोजी या प्रकरणात कटकारस्थानानुसार हा खून करण्यात आला. या संदर्भाने भारतीय दंड संहितेचे कलम 120 (ब) ची वाढ करून तपासीक अंमलदार पोलीस निरिक्षक संतोष तांबे यांनी सहा जणांना अटक केली. त्यानंतर एक, त्यानंतर दोन अशी एकूण संख्या 9 झाली. या 9 जणांची पोलीस कोठडी आज 13 जून रोजी संपली. या प्रकरणात 9 जून रोजी पुन्हा उज्जैन (मध्यप्रदेश) येथील दोघांना अटक झाली. त्यांची पोलीस कोठडी 15 जून पर्यंत आहे. पोलीसांनी न्यायालयात सादर केलेल्या अभिलेखानुसार या गुन्ह्यातील 9 जणांची सविस्तर भुमिका मांडलेली आहे. कोणी काय केले, कोणी मारेकऱ्यांना काय पुरवले, मारेकऱ्यांनी गोळीबाराचा सराव कोठे केला, त्यांनी वापरलेली गाडी कोणी जाळली. ज्या-ज्या गाड्यांचा वापर झाला. त्या-त्या गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणात अनेक साक्षीदार असे आहेत की, ज्यांनी कांही भितीपोटी, कांहींनी पैशांसाठी संजय बियाणी हत्याकांडातील मारेकऱ्यांना मदत केलेली आहे.
आज इंद्रपालसिंघ उर्फ सन्नी तिरथसिंघ मेजर(35) रा.चिखलवाडी नांदेड, मुक्तेश्र्वर उर्फ गोलु विजय मंगनाळे (25) रा.नाईकनगर नांदेड , सतनामसिंघ उर्फ सत्ता दलबिरसिंघ शेरगिल(28) रा.शहीदपुरा नांदेड ,हरदिपसिंघ उर्फ सोनु पिनीपाणा सतनामसिंघ बाजवा (35) रा.रामदास यात्रीनिवास नांदेड ,गुरमुखसिंघ उर्फ गुरी सेवासिंघ गिल (24) रा.शहीदपुरा नांदेड ,करणजितसिंघ रघबिरसिंघ शाहु (30) रा.बढपुरा नांदेड ,हरदिपसिंघ उर्फ हार्डी उर्फ लक्की बबनसिंघ सपुरे (28) रा.मराठवाडा एकजुट प्रेसजवळ नांदेड, कृष्णा उर्फ पप्या धोंडीबा पवार (28) रा.आमदुरा नांदेड ,हरीश मनोज बाहेती (28) रा.मारवाडगल्ली वजिराबाद नांदेड या 9 जणांची पोलीस कोठडी संपल्यानंतर संतोष तांबे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना न्यायालयात हजर केले. सोबतच या प्रकरणात मकोका कायदा वाढविल्याचे निवेदन प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात सादर केले. तसेच दहा प्रमुख आरोपी हरविंदर सिंघ उर्फ रिंदा चरणसिंघ संधू याने पकडलेल्या 9 लोकांसोबत मिळून अनेक गुन्हे नांदेड जिल्ह्यात केल्याची माहिती सादर केली.
तपासीक अंमलदार संतोष तांबे यांनी दि.9 जून रोजी या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) 1999 च्या कलम 3(1) (i),3(2), 3(4) समाविष्ट करून तपास करण्याचा प्रस्ताव पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांच्या मार्फत पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांच्याकडे पाठविला होता. तो निसार तांबोळी यांनी मंजूर केला आहे आणि तपास करण्याचे अधिकार बिलोली पोलीस उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधिक्षक अर्चित चांडक यांना दिले.
मकोका न्यायालयात जिल्हा सरकारी अभियोक्ता ऍड. आशिष गोदमगावकर यांनी या प्रकरणातील मकोका कायद्याअंतर्गत पोलीस कोठडी देणे कसे आवश्यक आहे हे सादर करतांना याप्रकरणात हरविंदरसिंघ उर्फ रिंदा, संजय बियाणी यांना गोळी मारणारे सुनिल आणि पहेलवान यांना पकडणे आहे आणि इतर अनेक बाबींचा तपास करणे आहे,तसेच अनेक बाबी मांडल्या. यासाठी पोलीस कोठडी द्यावी अशी विनंती अर्चित चांडक यांनी न्यायालयाला केली. आरोपींच्यावतीने सुध्दा हे प्रकरण मकोकाचे नाही असे सांगण्यात आले. युक्तीवाद ऐकून न्या.एस.ई.बांगर यांनी नऊ जणांना सात दिवस अर्थात 20 जून 2022 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.