नांदेड(प्रतिनिधी)-बिअर बारमधून चोरी गेलेला 12 हजार रुपयांचा मोबाईल शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने कांही तासातच शोधून काढला आणि चोरट्याला गजाआड केले आहे.
संदीप विठ्ठलराव नाईक हे 11 जून रोजी आनंद बिअर बार, आयटीआय चौक येथे जेवण करण्यासाठी गेले असतांना शेजारी टेबलावर बसलेल्या अनोळखी माणसाने त्यांची नजर चुकवून त्यांचा 12 हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरून नेला. शिवाजीनगरचे पोलीस निरिक्षक डॉ.नितीन काशीकर यांनी आपल्या गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि वाहुळे यांना हा मोबाईल शोधण्याची जबाबदारी दिली. पोलीस पथकाने संशयीत व्यक्ती अरुणकुमार मधुकरराव हंकारे (32) रा.लेबर कॉलनी नांदेड यास ताब्यात घेवून विचारपूस करून त्याच्याकडून संदीप नाईकचा चोरून नेलेला मोबाईल हस्तगत केला.
पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे यांनी गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरिक्षक मिलिंद सोनकांबळे, पोलीस अंमलदार शेख इब्राहिम, दिलीप राठोड, रवि बामणे, देवसिंग सिंगल, शेख अजहर, दत्ता वडजे यांचे कौतुक केले आहे.
