नांदेड(प्रतिनिधी)-संजय बियाणी हत्याकांडात आता अटक आरोपींची संख्या 11 झाली आहे. दिल्ली येथून पकडून आणलेल्या दोन युवकांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम.आर.सोवानी यांनी पाच दिवस अर्थात 15 जून 2022 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. या प्रकरणातील 9 जण अगोदरच 13 जून पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
5 एप्रिल रोजी नांदेड जिल्ह्यातील किंबहुना महाराष्ट्रात प्रसिध्द असलेले बांधकाम व्यवसायीक संजय बियाणी यांच्या घरासमोर दोन मारेकऱ्यांनी त्यांच्यावर दहा गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. या प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासासाठी विशेष तपास पथक एसआयटी तयार करण्यात आली. या एसआयटीमध्ये तपासीक अंमलदार पोलीस निरिक्षक संतोष तांबे आहेत. या प्रकरणात 31 मे पासून अटक सत्र सुरू झाले. त्यात 9 जण 13 जून पर्यंत पोलीस कोठडीत आहेत.
पोलीसांनी आपल्या तपासात घेतलेल्या मेहनतीनुसार राजपालसिंघ ईश्र्वरसिंघ चंद्रावत (29) रा.उज्जैन जिल्हा मध्यप्रदेश आणि आणि योगेश कैलासचंद भाटी रा.उज्जैन जिल्हा मध्यप्रदेश या दोघांना स्पेशल सेल दिल्ली गुन्हा क्रमांक 117/2022 मध्ये भारतीय हत्यार कायद्यानुसार अटक करण्यात आली होती. ती कार्यवाही महानगर दंडाधिकारी पटीयाला हाऊस कोर्ट नं.26 यांच्या दालनात झाली. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठउीत अर्थात तुरूंगात पाठविलेले होते, अशी माहिती प्राप्त झाली. या दोघांनी त्यावेळी दिल्ली पोलीसांकडे आम्ही दिपक नावाच्या पुर्ण नाव माहित नाही यासोबत नांदेड शहरात खून करण्यासाठी आलो होतो अशी माहिती दिली. दिपकच्या सांगण्यावरूनच बियाणीच्या हत्येचा कट रचला असे निष्पन्न होत आहे.तसेच या सर्व पुराव्यांच्या वेगवेगळ्या कड्या जोडून जबरदस्त साखळी तयार करण्यासाठी या दोन जणांची पोलीस कोठडी मागण्यात आली होती.
आज दि.11 मे रोजी पोलीस निरिक्षक संतोष तांबे, पोलीस उपनिरिक्षक गणेश गोटके, सचिन सोनवणे, कांही पोलीस अंमलदार आणि जलद प्रतिसाद पथकाच्या जवानांनी या दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयात सरकारी वकील ऍड. वाघमारे यांनी या प्रकरणात सरकारी पक्षाच बाजू मांडली.त्यामध्ये प्रत्येक आरोपीकडून काय पुरावा हस्तगस्त केला याचे सविस्तर सादरीकरण केले. सोबतच पिस्टल जप्त करणे आहे, नांदेड शहरात आल्यावर या दोघांना कोणी मदत केली, कोठे ते राहिले , कोण-कोणत्या वाहनांचा वापर केला. याची सर्व माहिती घेण्यासाठी पोलीस कोठडी आवश्यक आहे असे सांगितले. न्यायाधीश एम.आर.सोवानी यांनी या दोघांना 15 जून 2022 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. या प्रकरणात आरोपींच्यावतीने ऍड.यशोनिल मोगले यांनी सादरीकरण केले.
या प्रकरणात 13 जून 2022 पर्यंत पोलीस कोठडीत असलेल्या 9 आरोपींपैकी एका आरोपीसोबत बऱ्याच महिन्यांपासून एक पोलीस कर्मचारी दररोजच्या संपर्कात होता अशी माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. हा पोलीस कर्मचारी असंख्य महिन्यांपासून आजारी रजेवर असल्याची माहितीही प्राप्त झाली आहे. एक पोलीस कर्मचारी या कटकारस्थानाच्या सहभागात लिप्त असलेल्या आरोपीसोबत का कायम फिरत होता याचा सुध्दा शोध होण्याची नक्कीच गरज आहे.
संबंधीत बातमी…
संजय बियाणी हत्याकांडात दिल्ली येथून दोन आरोपी नांदेड पोलीस आणत आहेत