नांदेड(प्रतिनिधी)-राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे सन 2022-23 चे शैक्षणिक वर्ष दि.15 जून 2022 पासून सुरू करण्यात यावे असे आदेश शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी जारी केले आहेत. विदर्भातील शाळांना मात्र तेथील उष्णतेच्या प्रभावातून थोडीशी मुभा देत विदर्भातील शाळा 27 जूनपासून सुरू होणार आहेत.
राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी दि.9 जून रोजी जारी केलेल्या आदेशानुसार शासनाच्या निर्णयाप्रमाणे शैक्षणिक वर्ष 2022-23 दरम्यान पुन्हा एकदा शाळा सुरू करायचा विचार सोमवार दि.13 जून पासून होता. त्यात थोडासा बदल करत शिक्षण आयुक्तांनी 13 जून आणि 14 जून रोजी शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी शाळेत उपस्थित राहून स्वच्छता करून घेणे, शाळेचे सौंदर्यीकरण करणे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे कोविड-19 बाबत आणि आरोग्य विषयक उद्बोधन करणे असे कार्यक्रम आयोजित करावेत असे सुचवले आहे. 15 जून पासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शाळेत प्रवेश देण्याच्या सुचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. विदर्भातील शाळेबाबत असाच निर्देश देत 24 व 25 जून रोजी साफसफाई व आरोग्य विषयक उद्बोधन करावे आणि सोमवार 27 जून पासून प्रत्यक्षात विद्यार्थ्यासह शाळा सुरू कराव्यात असे या आदेशात म्हटले आहे.
