नांदेड(प्रतिनिधी)-ज्या पोलीस अंमलदारांकडे सरकारी शस्त्र आणि दारु गोळा आहे त्यांनी वेगवेगळ्या परिस्थितीत आपले शासकीय शस्त्र आणि दारु गोळा पोलीस मुख्यालयात जमा करावा असा आदेश बिनतारी संदेशानुसार गृहपोलीस उपअधिक्षक डॉ.अश्र्विनी जगताप यांनी जारी केला आहे.
दि.3 जून 2022 रोजी जावक क्रमांक 365 नुसार एक बिनतारी संदेश प्रसारीत करण्यात आला. हा बिनतारी संदेश गृहपोलीस उपअधिक्षक डॉ.अश्र्विनी जगताप यांनी स्वाक्षरीत केलेला आहे. या आदेशानुसार जे पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार नांदेडच्या पोलीस मुख्यालयातील शस्त्रागारातून शस्त्र घेतात असे पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार कधी रजेवर, सिक रजेवर, अर्जित रजेवर, बदलीवर जाण्यापुर्वी त्यांनी आपल्या जवळचे शस्त्र पोलीस मुख्यालय नांदेड येथे शस्त्रागारात जमा करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. शस्त्र जमा झाल्याची खात्री झाल्यानंतरच प्रभारी अधिकाऱ्यांनी त्यांना रजेवर किंवा बदलीवर सोडावे यात निष्काळजीपणा झाला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रभारी अधिकाऱ्यांवर राहिल.
ज्या अधिकाऱ्यांकडे आणि पोलीस अंमलदारांकडे शस्त्र आहे. त्यांनी लेखनीक(मोहरील) यांच्याकडे आपले शस्त्र जमा करू नये. मोहरील यांनी सुध्दा असे कोणतेही शस्त्र आपल्याकडे जमा करू नये व कोणतेही शस्त्र परस्पर पोलीस मुख्यालय येथे जमा करू नये. तसे केल्यास शस्त्र स्विकारले जाणार नाहीत. याची नोंद मोहरील यांनी घ्यायची आहे. तसेच काही पोलीस अनेकांकडे सुरक्षा गार्ड म्हणून काम करतात, काही शासकीय अधिकाऱ्यांकडे आहेत तर काही खाजगी लोकांकडे आहेत अशा प्रत्येक सुरक्षा रक्षकाने (गनरने) आपले शस्त्र ड्युटी संपताच पोलीस मुख्यालयातील शस्त्रागारात जमा करायचे आहे. जे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार बदलीवर, रजेवर जातेवेळेस शस्त्र जमा करूनच जावे, काही अनुचित प्रकार घडला तर त्याची जबाबदारी शस्त्र असलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदारासह त्या व्यक्तीच्या प्रभारी अंमलदाराची राहिल असे या बिनतारी संदेशात लिहिले आहे.
