नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीस निरिक्षकांनी 19 एप्रिल रोजी दिलेल्या तक्रारीवर कोणतीच कायदेशीर कार्यवाही केली नाही अशी माहिती वात्सल्यनगर सोसायटी सिडको नांदेड येथील माधव अमृतराव जाधव यांनी दिली आहे.
दि.19 एप्रिलच्या आठ दिवस अगोदर माधव अमृतराव जाधव यांनी स्वत:च्या फेसबुक पेजवर महाभारत या महाकाव्याशी निगडीत धार्मिक पोस्ट केली होती. तो एक छोटसा व्हिडीओ होता. त्या पोस्टवर तुळशीराम हनमंत जाधव रा.सुगाव ता.लोहा जि.नांदेड या माणसाने तुलसीभाई नावाचे फेक आयडी तयार करून त्या आयडीनुसार माझ्या फेसबुकवर अत्यंत घाणेरडी शिवीगाळ लिहिली. माधव जाधव यांनी याबद्दलची सर्व माहिती काढून याबद्दलची तक्रार पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण येथे 19 एप्रिल रोजी दिली. या अर्जावर 19 तारीख लिहिली आहे. पण पोलीस ठाणे अंमलदार नांदेड ग्रामीण यांनी आपल्या पोलीस स्टेशनचा रबरी शिक्का यावर मारुन त्यावर सही केली आहे. स्वत:चे नाव आणि बकल नंबरपण लिहिला आहे. पण स्वाक्षरीच्या खाली तारीख लिहिलेली नाही. या अर्जामध्ये तुळशीरामच्या काकाला माधव जाधव यांनी सांगितले असता त्यांनी फोनवरून तुळशीराम जाधवला असे न करण्याची सुचना दिली तरी तो ऐकत नाही असे लिहिलेले आहे.
या तक्रारीनंतर सुध्दा तुळशीराम हनमंत जाधव विरुध्द दहा दिवसांनी कांहीच कार्यवाही झाली नाही म्हणून पोलीस अधिक्षक कार्यालयात गेले तेथे त्यांनी तक्रार निवारण केंद्र क्रमांक 17 मध्ये जावून आपली व्यथा मांडली. पण त्यांना पोलीस अधिक्षकांची भेट करून देण्यात आली नाही. तेथूनच नांदेड ग्रामीणचे अशोक घोरबांड साहेब यांना फोन लावण्यात आला आणि त्यांना जावून भेटा असे सांगितले. त्यानुसार मी त्यांच्याकडे गेलो. पण ते हो मी गुन्हा दाखल करेल असे म्हणाले. पण नंतर मात्र भेटतही नाहीत आणि फोन सुध्दा उचलत नाहीत असे माधव जाधव यांनी वास्तव न्युज लाईव्हशी बोलतांना सांगितले आहे. एखाद्या तक्रारदाराने जी कांही तक्रार दिली असेल ती तक्रार घेणे आणि त्यावर योग्य कायदेशीर कार्यवाही करणे हा प्रकार म्हणजे पोलीसांचे कर्तव्य आहे असे मानले गेले. 14 एप्रिल ते 4 जून हा मोठा कालखंड आहे आणि एवढ्या कालखंडात यावर कार्यवाही झाली नाही ती दुर्देवी बाब नक्कीच आहे.
