दोन महिलांना अटक आणि 100 टक्के जप्ती
नांदेड(प्रतिनिधी)-1 जून रोजी दत्तनगर भागात रात्रीच्या अंधारात नैसर्गिक निधीसाठी थांबलेल्या एकाला चाकूचा धाक दाखवून त्याची लुट करणाऱ्या दोन महिलांना शिवाजीनगर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून त्या दिवशीची लुट आणि चोरलेले इतर सात मोबाईल असा 1 लाख 60 हजार 419 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा छडा शिवाजीनगर पोलीसांनी अवघ्या काही तासातच लावला.
दि.1 जूनच्या रात्री आलेगाव ता.कंधार येथील माधव अप्पाराव मोरे रेल्वे रुळांजवळ असलेल्या अंकुर हॉस्पीटलजवळ नैसर्गिक विधीसाठी थांबले असतांना दोन महिला आणि एक पुरूष अशा तीन जणांनी त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या खिशातील 3 हजार 400 रुपये रोख रक्कम, 12 हजार 500 रुपये किंमतीचा मोबाईल आणि 50 हजारांची दुचाकी असा 65 हजार 900 रुपयांचा ऐवज लुटला आणि मोरेच्या दुचाकीवर बसून हे तीन दरोडेखोर फरार झाले. या बाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 208/2022 दाखल होता.
शिवाजीनगर पोलीस निरिक्षक डॉ.नितीन काशीकर यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि वाहुळे, पोलीस उपनिरिक्षक मिलिंद सोनकांबळे, पोलीस अंमलदार शेख इब्राहिम, रवि बामणे, दिलीप राठोड, देवसिंग सिंगल, शेख अजहर यांनी चोरट्यांचा शोध घेतला असता त्यांना नावे माहित झाली. पण ही दरोडेखोर मंडळी नांदेडमधून बाहेर निघून गेली होती. पोलीस पथकाने अर्धापूर येथे जावून गंगासागर उर्फ माया राजू माथेकर(30) आणि सिमा संतोष निळकंटे (27) यांना ताब्यात घेवून त्यांनी मोरेकडून लुटलेला सर्व ऐवज तसेच इतर सात चोरीचे मोबाईल जप्त केले आहेत. या सर्व ऐवजाची किंमत 1 लाख 7 हजार 419 रुपये आहेत. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक रोडे हे करीत आहेत. पोलीस अधिक्षक अधिक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे यांनी शिवाजीनगर पोलीसांचे कौतुक केले आहे.
