नांदेड(प्रतिनिधी)-संजय बियाणी या बांधकाम व्यवसायीकाचे हत्या झाल्यानंतर अनेकांना आपल्यासमोर मृत्यू दिसत आहे अशी परिस्थिती तयार करून ते प्रशासनाला वेठीला धरण्याच्या मार्गावर होते. आता संजय बियाणी यांच्या हत्येचे गुढ पोलीसांनी उघड केले आहे. त्यामुळे आता आपल्याला लवकरच पोलीस सुरक्षा रक्षक मिळणार हे त्यांचेे दिवा स्वप्न भंग झाले आहे असे म्हणावे लागेल.
संजय बियाणी यांची हत्या झाली आणि त्यानंतर त्यांचा सुरक्षारक्षक काढला गेला. या विषयावर खुप मोठी चर्चा झाली. जो कांही घटनाक्रम कायदेशीर पणे घडला होता. तो अभिलेखावर उपलब्ध आहे. पण संजय बियाणी यांचा सुरक्षा रक्षक काढला म्हणूनच त्यांची हत्या झाली असा एक कांगावा तयार करून ज्या इतरांचे सुरक्षा रक्षक काढले गेले. त्याबद्दल बोंबाबोंब सुरू झाली. पोलीस प्रशासनाने याला चोख आणि कायदेशीर उत्तर दिले. त्यामुळे हा प्रकार थोडा थंडबस्त्यात गेला.
कांही दिवसांनी पुन्हा अर्ज बाजारी सुरू झाली. आमच्या मृत्यूची जबाबदारी पोलीसांवर आहे असा कांगावा तयार करण्यात आला. पोलीस अधिकाऱ्याविरुध्द पोलीस अधिकाऱ्याकडे तक्रारी करण्यात आल्या. कांही जणांनी शासकीय स्तरावर सुध्दा पदाधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या. यानंतर त्यांना आपल्याला लवकरच गणवेशधारक पोलीस सुरक्षा रक्षक मिळणार अशी स्वप्ने पडू लागली.
काल दि.1 जून 2022 रोजी पोलीसांनी संजय बियाणी हत्याकांडाचे गुढ उकलले. त्यामुळे ज्यांना सुरक्षा रक्षकाचे दिवा स्वप्ने पडत होती. ती आता कांही धुसर झाली आहेत. कारण संजय बियाणी यांची हत्या खंडणी आणि पैशांच्या देवाण-घेवाणीतून झाली असे पोलीसांनी जाहीर केले आहे. मग माहितीच्या अधिकाराचा वापर करून संपुर्ण देश भ्रष्टाचार मुक्त करण्याची मेहनत घेता घेता मोठा आर्थिक डोलारा तयार करणाऱ्यांना मरणाची भिती संजय बियाणी हत्याकांडासोबत जोडता येत नाही हे स्पष्ट झाले.
