नांदेड(प्रतिनिधी)-बांधकाम व्यवसायीक संजय बियाणी यांच्या हत्येचे गुढ पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांच्या नेतृत्वात नांदेड जिल्हा पोलीसांनी आज अंतिम स्वरुपात आणला. तीन आरोपींना या हत्येप्रकरणात अटक करण्यात आली. या व्यतिरिक्त इतर सातजण पोलीसांच्या ताब्यात आहेत. त्यांच्याबाबत तपास सुरू आहे.
5 एप्रिल 2022 रोजी सकाळी 10 वाजेच्यासुमारास शारदानगर भागातील रहिवासी आणि नामांकित बांधकाम व्यवसायीक संजय बियाणी यांची दोन जणांनी गोळ्या घालून हत्या केली होती. या संदर्भाने घडलेल्या प्रकारानंतर या प्रकरणाचा तपास योग्य व्हावा म्हणून विशेष तपास पथकाची (एसआयटी) ची स्थापना झाली. पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांच्या नेतृत्वात या हत्या प्रकरणाचा तपास सुरू झाला. एसआयटीचे प्रमुख अपर पोलीस अधिक्षक विजय कबाडे यांना बनविण्यात आले. घडलेला हत्येचा प्रकार हा संवेदनशिलच होता. त्यामुळे या प्रकरणासाठी पोलीसांनी अनेक पोलीस अधिकारी आणि अनेक पोलीस अंमलदारांचा वापर करून पुराव्याची एक-एक कडी जोडत साखळी तयार केली. नांदेड जिल्हा पोलीसांसह अनेक वरिष्ठ तपास यंत्रणा नांदेड पोलीसांना आपल्याकडे असलेल्या माहितीतून अवगत करत होते. अनेक अधिकारी आणि अनेक पोलीस अंमलदारांच्या मेहनतीनंतर अखेर संजय बियाणी यांची हत्या झाल्यानंतर दोन महिने पुर्ण होण्याअगोदरच पोलीसांनी या हत्याप्रकरणाचा छडा लावला.
खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इंदरपालसिंघ तिरथसिंघ मेजर आणि हरदिपसिंघ बाजवा,सतनामसिंघया तिन जणांना संजय बियाणी हत्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. याशिवाय सुध्दा पोलीस यंत्रणा सात जणांची तपासणी करत आहे. संजय बियाणी यांची हत्या घडल्यानंतर या प्रकरणाला अनेक वळणे देण्यात आली. सोबतच पोलीसांवर सुध्दा बियाणी कुटूंबिय आणि इतरांनी आरोप सुध्दा केले. कोणी एसआयटी याप्रकरणाचा तपासच करु शकणार नाही अशा आवया ठोकल्या. तरी पण पोलीसांनी आपला संयम कायम राखत आपल्या जबाबदारीला महत्व दिले आणि अखेर यश संपादन केले.
