नांदेड(प्रतिनिधी)-कोवडी कालखंडात आजारी विमा काढून कोविड इलाज केल्यानंतर विमा कंपनीने त्या विमा धारकाला तो झोपण्यासाठी दवाखान्यात भरती झाला होता. असा आशय लिहुन त्याच्या विमा नाकरणाऱ्याला चांगल्याच शब्दात समज देत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्षा अनुराधाा सातपुते आणि सदस्य रविंद्र बिलोलीकर यांनी चांगल्या, उत्कृष्ट शब्दांमध्ये आपले मत लिहुन निकाल जाहीर करतांना 82 हजार 67 रुपये उपचाराची रक्कम 9 टक्के दरसाल दर शेकडा व्याजासह 45 दिवसात देण्याचे आदेश दिले आहेत. सोबतच तक्रारदाराला झालेला मानसिक त्रास यासाठी 5 हजार आणि तक्रारीच्या खर्चासाठी 5 हजार असे 10 हजार वेगळे देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिले आहेत.
व्यंकटेश हनुमंतराव पालदेवार (50) यांनी आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इंन्शुरंस कंपनीकडून समुह विमा घेतलेला होता. या विम्याची मुदत 19 ऑगस्ट 2020 ते 28 ऑगस्ट 2021 पर्यंत मान्य होती. व्यंकटेश पालदेवार यांना ऑक्टोबर 2020 मध्ये सर्दी, ताप, अंगदु:खी व अन्य त्रास सुरू झाले. 31 ऑक्टोबर 2020 रोजी व्यंकटेश पालदेवार दवाखान्यात भर्ती झाले. 31 ऑक्टोबर रोजीच त्यांची कोविड चाचणी आरटीपीसीआर करण्यात आली. त्या आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल 2 नोव्हेंबर 2020 रोजी आला आणि कोविड आजार निष्पन्न झाला. त्यांनी 5 नोव्हेंबर 2020 पर्यंत उपचार घेतला. हा सर्व इलाज आशा रुग्णालयात करण्यात आला. त्याच्या खर्चाचे बिल 82 हजार 67 रुपये आले. याबाबत व्यंकटेश पालदेवार यांनी आपल्या विमा पॉलीसीतील तरतुदीनुसार 82 हजा 67 रुपये द्यावेत अशी मागणी आयसीआयसीआय लोम्बार्ड विमा कंपनीकडे केली विमा कंपनीने दि.25 मे 2021 रोजी व्यंकटेश पालदेवार यांची मागणी फेटाळून लावतांना चुकीची कारणे दिली असा आरोप करत व्यंकटेश पालदेवार यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग यांच्याकडे ग्राहक तक्रार क्रमांक 1853/2021 दि.2 जून 2021 रोजी दाखल केली . याबाबत आयोगासमोर आलेली कागदपत्रे आणि इतर पुरावे याची सविस्तरपणे छाननी करतांना व्यंकटेश पालदेवार यांनी मागितलेली विमा रक्कम चुकीच्या कारणास्त विमा कंपनीने नामंजुर केली. याचा खेद व्यक्त करत भरपूर कारणे लिहिली. आयोगाने लिहिल्याप्रमाणे कोविड आजार आला तेंव्हा मृत्यूची भिती जास्त होती. मार्गदर्शक नियम सांगणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे यात मोठा फरक आहे. कोरोना डॉक्टरकडे जातांना स्कोअर 7 होता. तो इलाजानंतरच 12 झाला असे अनेक प्रकार घडले. आजारी लोकांच्या रक्तात गाठी झाल्या.त्याचा इलाज करण्यासाठी डॉक्टरांकडेच जावे लागते. कारण तेथेच रुग्णाचे मनोधैर्य स्थिर राखता येते. अशा परिस्थितीत तो रुग्ण झोपण्यासाठी दवाखान्यात गेला असे म्हणणे कितपत योग्य आहे असा प्रश्न उपस्थित केला. विमा कंपन्या जाहीराती देवून विमा काढायला लावता मग विमा पॉलीसीची रक्कम देतांना विमा कंपनीचा सदउद्देश कोठे गेला. विमा पॉलीसीचा उपयोग घेण्यासाठी ग्राहक पॉलीस काढतात. मग त्याचा परतावा देतांना विमा कंपनी मागे का राहते. असाही प्रश्न उपस्थित केला. एकंदरीत विमा कंपनीने आता व्यंकटेश पालदेवार यांना 45 दिवसात 92 हजार 67 रुपये द्यायचे आहेत. त्यातील 82 हजार 67 रुपयांना दि.2 जुलै 2021 पासून दरसाल दर शेकडा 9 टक्के व्याज पण द्यायचे आहे. या प्रकरणात व्यंकटेश पालदेवार यांची बाजू ऍड. ए.पी.कुर्तडीकर यांनी मांडली. आयसीआयसीआय लोम्बार्ड कंपनीचे वकील ऍड. अविनाश कदम हे होते.
