नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड येथील स्थानिक गुन्हा शाखेने भिंगरी या देशी दारुचे 12 बॉक्स आणि एक कार असा 2 लाख 34 हजार 560 रुपये किंमतीचा मुद्देमाल पकडून जबरदस्त कार्यवाही केली आहे.
स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांना अत्यंत गुप्तपणे मिळालेल्या माहितीच्या आधारावर त्यांनी 29 मे रोजी सकाळी 10 वाजता पोलीस उपनिरिक्षक सचिन सोनवणे, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक श्री.गोविंदरावजी मुंडे साहेब, पोलीस अंमलदार संजय केंद्रे, गुुंडेराव कर्ले, बालाजी यादगिरवाड आणि शंकर केंद्रे यांना आसना टी पॉईंटजवळ पाठविले. आपल्या पोलीस निरिक्षकांनी सांगितलेली कार्यवाही फत्ते करण्यासाठी अत्यंत चाणाक्ष नजरेतून त्या भागात नजर ठेवली आणि एम.एच.26 ए.एफ.702 क्रमांकाची कार थांबवली. या कारमध्ये भिंगरी या देशी दारुचे 12 बॉक्स सापडले. त्यांची किंमत 34 हजार 560 रुपये आहे. या संदर्भाने साईकुमार नामपल्ली रुद्रारम (22) रा.तेलंगणा ह.मु.सांगवी याला ताब्यात घेतले. त्याच्या चार चाकी वाहनाची किंमत 2 लाख रुपये आहे. असा एकूण 2 लाख रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हा शाखेने मोठ्या शिताफीने पकडला.
यासंदर्भाने पोलीस अंमलदार संजय विश्र्वनाथराव केंद्रे यांनी पोलीस ठाणे विमानतळ येथे तक्रार दिली आहे. या संदर्भाचा गुन्हा वृत्तलिहिपर्यंत दाखल करण्याची प्रक्रिया पुर्ण झाली नव्हती.
