ताज्या बातम्या विशेष

राज्यभरातील पोलीसांनी दखल घ्यावी असा प्रसंग ; मृत्यूकडे ओढल्या जाणाऱ्या युवकाचे प्राण वाचवले

ऍनराईड फोनच्या मुक्त वापराचा दुष्परीणाम
नांदेड(प्रतिनिधी)-हिंदी चित्रपटामध्ये एक गाणे आहे, “भला किजे भला होगा, बुरा किजे बुरा होगा’ अशाच एका पध्दतीने वजिराबाद पोलीसांनी 29 तारखेच्या पहाटे 4 वाजेच्या सुमारास चार दिवसापासून आत्महत्येचा विचार करत नांदेडच्या बसस्थानकावर थांबलेल्या एका 21 वर्षीय युवकाला ओळखले आणि त्याचे समुपदेशन करून त्याला आई-वडीलांसोबत दिवस उजाडल्यावर घरी पाठवून दिले. हा सर्व प्रकार ऍनराईड फोनच्या वापरातून घडला. पालकांनी आम्ही लिहिलेल्या घटनेला अत्यंत गांभीर्याने घेण्याची गरज आहे. तरच तुमच्या कुटूंबातील सर्व कांही छान चालेल. नसता उद्या पश्चाताप करण्याची वेळ येईल. पोलीस विभाग सुध्दा जगात वावरत असतांना आपल्या नजेरतून काय-काय शोधतो याचे हे एक जीवंत उदाहरण आहे. समाज पोलीसांविषयी नेहमीच वाईट बोलतो पण या घटनेची दखल आम्ही घेतली नसती तर आम्हीच आमच्या लेखणीसोबत बेईमानी केल्यासारखे होते.
नांदेड शहरातील वजिराबाद पोलीस ठाण्यात दि.28 मे 2022 च्या रात्री 8 ते 29 मे च्या सकाळी 8 यावेळेत पोलीस उपनिरिक्षक प्रविण आगलावे हे ड्युटी ऑफीसर होते. रात्री 11 नंतर ड्युटी ऑफीसरने आपल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त करावी हा त्यांच्या कर्तव्याचा भाग आहे. गस्त करत असतांना छोट्या-छोट्या गोष्टीकडे लक्ष देवून त्यातून मोठा योग साध्य करणे यासाठी पोलीसांना लाखो प्रकारच्या संधी उपलब्ध होतात. पण त्या संधीचे सोने करण्याची तयारी ज्यांची आहे. त्यांचेच नाव पुढे घेतले जाते. नाही तर महाराष्ट्रात दीड लाख पोलीस आहेत. पण सर्वांचीच नावे आठवणीत नसतात. या आठवणी तयार करतांना त्या उगीचच मिळत नसतात. खरेदी करता येत नाहीत. कोणी भेट वस्तू म्हणून देत नाहीत. त्यासाठी मेहनत घ्यावी लागते आणि त्यातूनच अशा आठवणी तयार होतात आणि बऱ्याच लोकांच्या मनात कायम राहतात.
काल रात्रीचे ड्युटी ऑफीसर प्रविण आगलावे यांनी आपल्या ठाण्यातील पोलीस गाडीचे चालक संतोष बनसोडे यांच्यासोबत 29 मेच्या पहाटे 3.30 वाजता नांदेडचे बसस्थानक गाठले. या वेळेदरम्यान आणि यानंतरच्या एक तासात रेल्वे स्थानक ते बसस्थानक जाणाऱ्या रस्त्यावर बरेच कुकर्म होत असतात. त्यांच्यावरही आपली पाळत राहिल आणि बसस्थानकात काय चालले आहे याची चाहुल घेण्यासाठी आगलावे आणि बनसोडे बसस्थानकात आले. बसस्थानकात गाडी गोल फिरवून सुध्दा त्यांची गस्त पुर्ण झाली असती. पण हे दोघे खाली उतरले आणि बसस्थानकाच्या शेडमध्ये फिरू लागले. त्यांच्या नजरेस एक 21 वर्षाचा युवक आला आणि तो त्यांना जगापेक्षा कांही वेगळा वाटला. कारण त्याच्याकडे कोणतेही प्रवासाचे साहित्य नव्हते. त्याचा चेहरा पोलीसांना भरपूर कांही सांगत होता आणि आपल्या पोलीस असल्याचा आधार त्यांनी त्या युवकाला जवळ बोलावून सुरूवात केला.
सुरूवातीला तपासणीमध्ये हा युवक मी परभणी जिल्ह्याचा आहे असे सांगत होता. पोलीस मात्र पोलीसच असतात आणि त्यावेळी आगलावे यांनी त्या युवकाला परभणीच्या खासदारांचे नाव विचारले. पण त्याला सांगता आले नाही आणि येथेच पोलीसांच्या मनात हा युवक म्हणजे कांही तरी गडबड आहे असा भाव बसला. त्या युवकाचा चेहरा सांगत होता की, त्याला भुक लागली आहे. त्याने कांही दिवसांपासून जेवण केलेले नाही. यामुळे सुरूवातीला पोलीसांनी त्याला जेवणाची ऑफर केली आणि जेवणाची ऑफर त्याच्या मनात पोलीसांविषयी आदर भाव तयार करून गेली. इतरांना जेवणाची सोय करणे ही काही पोलीसांची जबाबदारी नाही पण पोलीस सुध्दा याच समाजात जन्मलेला व्यक्ती आहे आणि या समाजात जन्मल्यानंतर या समाजाची सेवा करणे हे प्रत्येक जन्म घेणाऱ्या व्यक्तीचे कर्तव्य आहे. नेमकी हीच भावना आपल्या मनात राखत आगलावे आणि बनसोडे या पोलीसांनी त्या युवकाला जेवणाची सोय केली. आपल्या गाडीत दोनच माणसे आहोत, यालाही सोबत घेवून जाऊ असा विचार करून दोन्ही पोलीसांनी त्याला आपल्यासोबत गाडीत बसवून घेतले. आपल्या कर्तव्याची रात्रीची गस्त पुर्ण करून पोलीस ठाणे गाठले. त्यावेळी 29 मेच्या पहाटचे 5 वाजले होते.
पोलीस कोणत्या पध्दतीने आपल्याला हवी ती माहिती काढतील याचा कांहीच अंदाज आजपर्यंत कोणी बांधू शकला नाही. तसा अंदाज बांधणे अशक्यच असते. त्याच पध्दतीने आगलावे आणि बनसोडे यांनी या युवकाशी संवाद साधला तेंव्हा त्यांच्या पायाखालील जमीन हलू लागली. युवक सांगत होता मी चार दिवसापासून घरातून बाहेर आलो आहे. जेवण केलेले नव्हते. आपण जेवण दिल्यामुळे चार दिवसानंतर मला अन्नाचा स्वाद आला. युवकाने सांगितलेली हकीकत मात्र भयंकर आहे. तो सांगत होता माझ्याकडे मोबाईल नाही, माझ्या आईच्या ऍनराईड मोबाईलचा वापर मी कधी-कधी करत होता आणि त्यातून मला आठ दिवसांपुर्वी एका महिलेने व्हिडीओ कॉल केला आणि महिला पुर्णपणे नैसर्गिक अवस्थेत होती. एक मिनीट आणि पाच सेकंद मी त्या महिलेशी बोललो आणि त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून या युवकाची ब्लॅकमेलिंग सुरू झाली. कोण्या तरी युवकाने फोन करून तुझा हा व्हिडीओ तुझ्या आई-वडीलांना पाठवला जाईल, समाजात व्हायरल केला जाईल आणि तुझी बदनामी होईल असे सांगत त्याकडून पैशाची मागणी झाली. आपल्याकडे तर पैसे नाहीत तेंव्हा मुलाने आईच्या बॅंक खात्यातून धमकी देणाऱ्या युवकाला 30 हजार रुपये ऑनलाईन हस्तांतरीत केले. त्यानंतर मनातली भिती जास्त झाली आणि त्याने घर सोडले. चार दिवसापासून तो नांदेडच्या बसस्थानकावर वास्तव्यास होता आणि या चार दिवसांमध्ये आलेल्या अनुभवांनी त्याला मृत्यूकडे ओढण्यास सुरूवात केली होती. पण सुदैवाने पोलीस उपनिरिक्षक प्रविण आगलावे आणि पोलीस अंमलदार संतोष बनसोडे यांच्या प्रयत्नांनी या युवकाचा आत्महत्येचा विचार थांबला.
या युवकाने चार दिवसातील बस स्थानकातील अनुभव सुध्दा पोलीसांना सांगितला. त्यात युवक 21 वर्षाचा कांही लोकांना आवडेल अशीच त्याची शरिरयष्टी आणि यामुळे त्याला अनेक किन्नरांनी घेरले. सोबतच समाजात ज्या लोकांना आम्ही प्रतिष्ठीत मानतो अशा कांही लोकांनी त्या युवकाला आपल्या चार चाकी वाहनात घेवून जाण्याची हुल देत आपल्यासोबत चलण्यास सांगितले. पण सुदैवाने, त्याच्या आई-वडीलांच्या पुण्याईने त्या युवकाला प्रविण आगलावे आणि संतोष बनसोडे भेटले.
खरे तर ऍनरॉईड मोबाईलचा वापर किती घातक आहे हे वाचकांच्या लक्षात आले असेल पण 21 वर्षीय युवकाला आपल्यासोबत झालेल्या ब्लॅकमेलिंगला कसे थांबवता येते. याची जाण नसल्यामुळे तो 30 हजारांना गंडवला गेला. हा युवका नांदेड जिल्ह्याच्या शेजारच्या नंतरच्या जिल्ह्यातला राहणारा आहे. पण ब्लॅकमेलिंग झाली तेंव्हा तो पोलीसांकडे गेला नाही. गेला असता तर नक्कीच पोलीसांनी त्याच्या ब्लॅकमेलिंगची दखल घेतली असती आणि ब्लॅकमेल करणाऱ्याला धडा शिकवला असता. पण कायद्याची जाण नाही चुकीने घडलेल्या एका फोन कॉलच्या परिणामात त्याला आईला लपवून 30 हजार रुपये ऑनलाईन हस्तांतरीत करावे लागले आणि त्यानंतर मरण गोड वाटू लागले. या परिस्थितीत आज हा युवकच आहे असे नाही. नांदेड जिल्ह्यात या पुर्वी सुध्दा असे अनेक प्रकार घडलेले आहेत. कांही लोकांनी ब्लॅकमेलिंग करणाऱ्याविरुध्द गुन्हे नोंदवले आहेत. पोलीसांनी सुध्दा त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. तेंव्हा पोलीसांना नेहमीच कटाक्ष करण्यापेक्षा त्यांनी निवडलेली पोलीस सेवा ही त्यांच्या आवडीची असली तरी त्या आवडीमध्ये हित समाजाचे आहे. कांही सुर्याजी पिसाळ वृत्तीची मंडळी तेथेही आहेत पण सुर्याजी पिसाळाला ओळखते कोण आणि जे ओळखतात त्यांच्याकडे सुर्याजी पिसाळ वृत्तीची किंमत काय? अशा परिस्थिती समाजाने आपल्या बालकांना, बालिकांना ऍनरॉईड फोन देत असतांना त्यावर अत्यंत बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे नसता आपल्या हातून अशी चुक का झाली याचा पश्चाताप करण्याशिवाय कांही एक शिल्लक राहणार नाही.
या युवकाचे नाव आणि पत्ता आम्ही लिहिलेला नाही . त्यात त्या युवकाच्या भल्याचाच विचार आहे. पोलीसांना हकीकत माहित झाल्यानंतर पोलीसांनी त्याचे आई-वडील आणि इतर नातलगांना बोलावले आणि सुखरूपपणे त्याचा ताबा त्यांना दिला. पोलीसांच्या मेहनतीनेच त्या आई-वडीलांचा हा पुत्र मृत्यूपासून वाचला. 21 वर्षाच्या वयात जग कळत नाही आणि त्या युवकाला जग कोणी शिकवले नाही. म्हणूनच अशी परिस्थिती तयार झाली. अशा फोन कॉलमधून ब्लॅकमेलिंगचे प्रकार देशभर सुरू आहेत. पण अशा परिस्थितीत सुध्दा कोठे प्रविण आगलावे आणि संतोष बनसोडे सुध्दा आहेत त्यांची दखल आज आम्ही घेतली नसती तर आमच्या लेखणीसोबत आम्हीच बेईमानी केली असती. आता तरी पालकांनी आपल्या बालक आणि बालिकांना ऍनराईड फोनचा वापर मुक्त करण्याऐवजी तो नियंत्रीत करावा यासाठीच आमचा हा शब्द प्रपंच.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *