ताज्या बातम्या नांदेड

प्रभाग 9 मध्ये दुषीत पाणी, ड्रेनेज लाईन तुंबल्या -गणेश तादलापूरकर

नांदेड,(प्रतिनिधी)-प्रभाग क्रं.9 मध्ये दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा केला जात आहे त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. तसेच ड्रेनेज लाईन नेहमीच ब्लॉक होत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. याकडे मनपा प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नांदेड शहर जिल्हा सरचिटणीस गणेश तादलापुरकर यांनी केली आहे.

नांदेड महानगरपालिका हद्दीत प्रभाग क्रमांक 9 मध्ये विष्णुनगर, हमालपुरा, मगनपुरा, खोब्रागडेनगर नंबर 1 व 2, ईश्‍वरनगर या भागांमध्ये जवळपास 70 टक्के लोक हे दलित, मागासवर्गीय-मध्यमवर्गीय असून या भागात बरेच दिवसापासून महापालिकेच्यावतीने पुरवठा केला जाणारा पाणीपुरवठा त्यात अतिशय दुर्गंधयुक्त व गढूळ पाणी महापालिकेच्यावतीने पुरवठा होत आहे. तसेच सदरच्या भागांमध्ये ड्रेनेज लाईन या बर्‍याच दिवसापासून तुंबलेल्या आहेत. ज्यामुळे नागरिकांच्या घरातील सांडपाण्याचा निचरा होत नाही. ते घाण पाणी ड्रेनेज चेंबर मधून परत रस्त्यावर साचत असून त्यामुळे त्या भागात खूप मोठ्या प्रमाणामध्ये घाण पाणी दुर्गंधीयुक्त व मच्छरांचे प्रमाण वाढले आहे. परिसरात स्वच्छता नसल्याने घाणीचे प्रमाण वाढलेले आहे. याबाबत स्थानिक नगरसेवकांना वेळोवेळी सूचना केल्या आहेत. त्यांच्या निदर्शनास सुद्धा आणून दिलेल्या आहेत तरी सुद्धा त्यांना या भागात येऊन पाहणी करण्यासाठी वेळ नाही. तसेच महापालिकेचे अधिकारी व कर्मचार्‍यांना देखील प्रत्यक्ष भेटून सूचना केले असून आजपर्यंत या भागांमध्ये या नागरिकांच्या अडचणी कडे गांभीर्याने पाहिले जात नाही. पावसाळ्यापूर्वी या भागातील रस्त्याचे काम व ड्रेनेजचे काम व पाणीपुरवठा करणारे लाईनचे काम हे सर्व वेळेत पूर्ण झाले नाही तर या भागात राहणार्‍या नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. या भागात पावसामुळे साचलेले पाणी नागरिकांच्या घरात जमा झाल्याने त्यांचे खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होऊ शकते सर्व गोष्टी कडे महापालिकेचे आयुक्त व पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी यांनी या भागात येऊन पाहणी करावी व वरील ठिकाणीची सर्व कामे तात्काळ सुरू करावे. अशी मागणी या भागातील नागरिकांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस गणेशअण्णा तादलापूरकर यांनी केली आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *