नांदेड,(प्रतिनिधी)- २२ मे रोजी कुंडलवाडी रस्त्यावर रोखून लूट करणाऱ्या दरोडेखोराला बिलोलीचे सहायक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक आणि त्यांच्या पथकाने जेरबंद केल्या नंतर बिलोली न्यायालयाने त्यास दोन दिवस पोलीस कोठडीत पाठवले आहे. या प्रकरणातील दरोडेखोराने जनतेतील कोण्याही व्यक्तीसोबत काही बेकायदेशीर कृत्य केले असेल तर त्यांनी याबाबतची कायदेशीर तक्रार पोलिसांकडे नोंदवावी असे आवाहन बिलोलीचे सहायक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी केले आहे. पोलीस स्टेशन बिलोली येथे दिनांक २२ मे २०२२ रोजी दत्तात्रय मारोती चंदनकर (२८) व्यवसाय शिक्षण रा. दत्त नगर बिलोली यांच्या दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन बिलोली येथे गु.र.न. ११६/२०२२ कलम ३९४ भा.द.वी. हा गुन्हा अज्ञात दरोडेखोरा विरुद्ध दाखल झाला. या गुन्हयातील तक्रारदारास कुंडलवाडी रस्त्यावर अंधारात रात्रीच्या वेळी अडवून मारहाण करून त्याच्या कडून मोबाईल, काही रक्कम आणि मोटार सायकल घेवून आरोपी फरार झालेला होता. सदर गुन्हयासंबधाने पोलीस सहायक पोलीस अधीक्षक ,अर्चीत चांडक यांना प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारावर त्यांनी पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे,पोलीस उप निरीक्षक सय्यद पोलीस अंमलदार आचेवाड,मारोती मुद्देमवार,भगवान कोत्तापल्ले ,व्यकंट घोंगडे , रवी पीटलवाड यांना सोबत घेऊन बिलोली येथील कुख्यात व्यक्ती किरण तुडमे यास त्याच्या राहत्या घरातून अटक केली. तपासिक अंमलदार पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांनी आज किरण तुडमेला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास दोन दिवस पोलीस कोठडीत पाठवले आहे.
सहायक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी जनतेला आवाहन केले आहे की,किरण तुडमेने कोणालाही त्यास देऊन गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य केले असेल तर कोणतीही भीती मनात न बाळगता त्या घटनेची माहिती पोलिसांना देऊन त्या बाबत रीतसर तक्रार द्यावी. किरण तुडमे आणि त्याच्या सारख्या गुन्हेगारांकडून सर्व सामान्य माणसाचे रक्षण करण्यासाठी पोलीस दल जनतेचे बांधील आहेत.